Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान मोदी उद्या साधणार सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद

पंतप्रधान मोदी उद्या साधणार सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद

सार्वमत 

नवी दिल्ली – करोनामुळे देशात असलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपत असल्याने, त्यानंतर काय करायचे, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या(11 मे) देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने चर्चा करणार आहेत. देशातील लॉकडाऊन चौथ्यांदा वाढवायचा की, सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत करायचे, याबाबतचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. देशात करोनाचे रुग्ण समोर आल्यानंतर पहिल्यांदा 24 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत, तर दुसर्‍यांदा 15 एप्रिल ते 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला होता. 4 मे पासून तिसर्‍यांदा लॉकडाऊनची मुदत 17 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे देशातील सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. देशातील रेल्वे, विमान आणि बसवाहतूक पूर्णपणे बंद आहे. लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात मात्र बर्‍याच प्रमाणात आर्थिक व्यवहार पूर्ववत करायला काही बंधनांसह परवानगी देण्यात आली होती.
तीन लॉकडाऊननंतरही देशातील करोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे 17 मेनंतर काय करायचे, लॉकडाऊनची मुदत चौथ्यांदा वाढवायची की लॉकडाऊन उठवायचे, असा गंभीर प्रश्न केंद्र सरकारसमोर निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही 17 मे नंतर सरकारची काय योजना आहे, असा प्रश्न विचारला आहे.

चौथ्यांदा लॉकडाऊन लागू केले नाही, तर देशातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शंका आरोग्य मंत्रालयासह एम्स आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च (आयसीएमआर) यांनी वर्तवली आहे. अनेक राज्य सरकारेही लॉकडाऊन वाढविण्याच्या बाजूने आहे. तेलंगणा सरकारने तर, 29 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी राज्यांशी चर्चा केल्यानंतरच तिसर्‍यांदा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता पुन्हा विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यासाठी केंद्र आणि संबधित राज्य सरकारांनी केलेली व्यवस्था पाहता, लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या