Friday, May 3, 2024
Homeनगरसंगमनेर पाठोपाठ घुलेवाडी लॉकडाऊन

संगमनेर पाठोपाठ घुलेवाडी लॉकडाऊन

घुलेवाडी (वार्ताहर)- संगमनेर शहरातील कुरणरोड येथे एक महिला करोनाबाधीत आढळल्याने शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहराजवळच असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीने देखील करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कालपासून घुलेवाडीत कडकडीत बंद ठेवण्यात येत आहे. याबाबतचा निर्णय ग्रामसुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार घुलेवाडी ग्रामपंचायतीने करोना ग्राम सुरक्षा समिती स्थापन करून आवश्यक अंमलबजावणी केलेली आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तींना विलगीकरण करण्यासाठी शासकीय आदिवासी विकास विभागाचे वसतिगृह निर्जंतुकीकरण करून ताब्यात घेतलेले आहे. यामध्ये आत्तापर्यंत दहा ते बारा व्यक्तींना विलगीकरण करण्यात आले आहे.

- Advertisement -

घुलेवाडीमध्ये बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींची माहिती नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र घुलेवाडी येथे कळवावी तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा दुपारी 12 ते 3 या दरम्यान सुरू राहतील या व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने आणि इतर सेवा तूर्त बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील एक व्यक्ती संशयित म्हणून अहमदनगर येथे नेण्यात आला आहे. या घटनेने घुलेवाडीत धोका निर्माण होऊ शकतो याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे सूचना केल्या होत्या याच पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टाळण्यासाठी घुलेवाडी गावातील अंतर्गत रस्ते बंद करण्याचा निर्णय करोना ग्रामसुरक्षा समिती, ग्रामपंचायत घुलेवाडी यांनी घेतला आहे.

यामध्ये मालदाड रोड, तिरंगा चौक, साई श्रद्धा चौक, पावबाकी, गगनगिरी चौक, अमृतनगर रस्ता, महात्मा फुले शाळा रोड, घुलेवाडी फाटा लगतचे रस्ते, कंजारभाट वस्ती, वडार वस्ती, साईनगर, इंद्रायणी कॉलनी, फ्लोरा टाऊनशिप, संगम हाऊसिंग सोसायटी आदि रस्ते बंद करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये खबरदारी म्हणून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

घुलेवाडीत यापूर्वीच सर्व अवैधधंद्यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. यापूर्वीही अनेक अवैधधंद्यांवर कारवाई करण्यात आली असून यापुढे अवैध धंदे करताना कोणी आढळल्यास संबंधितावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा सरपंच सोपान राऊत यांनी दिला आहे. या समितीच्या बैठकीस अध्यक्ष सरपंच सोपान राऊत, ग्रामसेवक सुभाष कुटे, तलाठी बी. एस. काकड, पोलीस पाटील नंदू वाकचौरे, जि. प. सदस्य सिताराम राऊत उपस्थित होते.

पुण्यावरून आलेल्या एक महिला व एक पुरुष या दोन व्यक्ती विलगीकरण कक्षात न राहता परस्पर घरी निघून गेल्या आहेत. याबाबतची तक्रार करोना ग्राम सुरक्षा समितीने तहसीलदार संगमनेर तसेच शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र अद्याप ही व्यक्ती विलगीकरण कक्षात राहण्यास तयार नसल्याने इतर नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या