Saturday, May 4, 2024
Homeनगर2025 पर्यंत नाशिक विभाग हिवताप मुक्त होणार

2025 पर्यंत नाशिक विभाग हिवताप मुक्त होणार

डॉ. पी. डी गांडाळ : 2019 मध्ये हिवतापाचे अवघे 46 रुग्ण आढळले

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात मलेरिया प्रतिबंधात्मक उपाय योजना योग्य पद्धतीने केल्याने मलेरिया हा आजार देशातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर भारतातील मलेरिया प्रतिबंधक औषधांची मागणी देखील वाढत आहे. 2010 मध्ये मलेरियाचे 10 हजार 721 रुग्ण आढळले होते तर 2019 मध्ये अवघे 46 रुग्ण सापडल्याने मलेरिया वरील प्रतिबंधात्मक उपाय योजना किती प्रभावी पाने राबविली गेली हे सिध्द होत असल्याची नाशिक विभागाचे हिवताप सहाय्यक संचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.

- Advertisement -

नाशिक विभागात नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार व धुळे या 5 जिल्ह्याचा समावेश असून 431 ठिकाणी मलेरिया चिकित्सालये व उपचार केंद्रे स्थापन केलेली आहेत. त्यामुळे या विभागात मलेरियाच्या रुग्णांची संख्या सातत्याने घटतांना दिसत आहे. नागरिकांमध्ये वाढलेली जागरूकता आणि कार्यतत्पर आरोग्यसेवा यांचा हा सकारात्मक परिणाम आहे. त्यामुळे 2020 मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.

किटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक येथे सहाय्यक संचालक (हिवताप) हे विभागीय कार्यालय आहे. किटकजन्य आजारात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि हत्तीरोग या सारख्या आजारांचा समावेश होतो. एकेकाळी मलेरियाच्या साथीने सर्वत्र थैमान घातले होते यात अनेकांचे बळी सुद्धा गेले, मात्र मलेरिया या आजारावर वेळीच औषधोपचार घेतल्यास हमखास नियंत्रण मिळवता येते.

या आजाराचे रुग्ण व मृत्यूचे प्रमाण संपुष्टात आणण्यासाठी प्रशासन विशेष काळजी घेते नाशिक विभागातील 54 तालुक्यांमध्ये हा आजार होऊच नये, यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत जनजागृती मोहीमा सातत्याने राबविल्या जात आहेत. 2008 ते 2019 दरम्यान हिवताप रुग्णांचे वर्षनिहाय घटते प्रमाण दिसून आले असून 2020 मध्ये ते प्रमाण अगदी नगण्य आहे.

गेल्या वर्षी मलेरियाच्या रुग्णांची संख्या 46 असून नाशिक, नगर, जळगाव या 3 जिल्ह्यात संख्या अत्यल्प आहे, तर नंदुरबार व धुळे या दोन जिल्ह्यात मलेरियाचे रुग्ण आढळत आहेत. ते ही गुजरात व मध्यप्रदेश सीमेवरील चरितार्थासाठी स्थलांतरित होणार्‍या मजुरांमध्ये मलेरियाचे प्रमाण जास्त आहे.

यंदा एप्रिल अखेर अवघे 8 रुग्ण
2019 मध्ये विभागात 2 कोटी 12 लाख 15 हजार 86 लोकसंख्येत तापाच्या रुग्णांचे 26 लाख 95 हजार 955 रक्त नमुने संकलित करून तपासणीत अवघे 46 रुग्ण आढळले होते. यावर्षी एप्रिलअखेर विभागात 7 लाख 11 हजार 67 रक्त नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये हिवतापाचे 8 रुग्ण आढळले. ताप रुग्णाचे आशा व आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत नियमित रक्त नमुने घेऊन तपासणी अंती रुग्णांवर मोफत उपचार केले जातात त्यामुळे नाशिक विभागातील रुग्णांची संख्या झपाट्याने घटतांना दिसून येते. यामुळे 2025 पर्यंत नाशिक विभाग मलेरिया मुक्त होईल असा विश्वास विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. गांडाळ यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या