Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूरच्या गुन्हेगारांचा राहात्यात गोळीबार

श्रीरामपूरच्या गुन्हेगारांचा राहात्यात गोळीबार

जमावाने एकास पकडले, दोघे पळाले

राहाता (तालुका प्रतिनिधी) – राहाता शहरात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार झाला असून जमावाने एका आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तर दोघे पसार झाले. राहाता पोलिसांनी तिघा जणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

तीन दिवसांपूर्वी राहाता येथील गोदावरी कालव्यावरील पत्री पुलाजवळ वैभव ताठे या तरुणास, या तीन आरोपींनी मारहाण करून त्याच्याकडील सहा हजार रुपये बळजबरीने चोरून नेले. सदर आरोपी काल शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास याच परिसरात पल्सर मोटार सायकलवर फिरताना, वैभव ताठे यास दिसून आले.

ताठे याने याबाबतची माहिती आपल्या भावाला आणि सहकार्‍यांना दिली. त्यांनतर संबंधित सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने मदतीला धावून येऊन त्यांनी आरोपीला घेरले. पल्सर मोटारसायकलवर असलेल्या तीन आरोपींनी मोटारसायकल तेथेच टाकून बाजूच्या शेतामध्ये पळ काढला. त्यांचा पाठलाग करत जमाव त्यांच्यामागे धावला. यावेळी आरोपीतील एकाने त्याच्या जवळील गावठी कट्ट्यातून जमावाच्या दिशेने गोळीबार केला. तर एकाने हातातील कोयता उगारला आणि परत पळ काढला. पळत असताना यातील हातात कोयता असलेला आरोपी शेतातील बांधाला पाय अडकून पडल्याने नागरिकांच्या तावडीत सापडला तर दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या आरोपीला जमावाने बेदम मारहाण केली आणि राहाता पोलिसांना घटनेची माहिती दिली.

राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाने पकडलेल्या आरोपीस ताब्यात घेत दोघा पसार आरोपींचा नागरिकांसह परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधाराचा फायदा घेत ते दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
सदर घटनेची माहिती काळताच श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी दाखल होत पहाणी केली तर तपसाबाबत सूचना केल्या.

यातील नारायण म्हस्के या आरोपीस राहाता पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात वैभव ताठे याच्या फिर्यादीवरून जबरी चोरी आणि आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस करत आहेत.सदर आरोपींच्या मागावर तीन दिवसांपासून श्रीरामपूरचे पोलीसही असल्याचे कळते.

घटनेची माहीती कळताच राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी घटनास्थळी भेट देत पोलीस अधिकार्‍यांची भेट घेत राहाता परिसरात गावठी कट्टा दाखवून होत असलेल्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली.गेल्या काही दिवसांपासून मालवाहतूक गाड्या लुटणे तसेच एकट्या नागरिकांना लुटण्याच्या अनेक घटना घडल्या असून यातील आरोपींचा तातडीने शोध घेऊन पोलिसांनी या घटनांना जरब बसवावी, अशी मागणी डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्याकडे केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या