Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपुरातून गुजरातच्या मजुरांसाठी रवाना बसमध्ये चक्क एमपीचे प्रवासी; प्रशासनाच्या सुचनेनंतर मार्ग बदलला

श्रीरामपुरातून गुजरातच्या मजुरांसाठी रवाना बसमध्ये चक्क एमपीचे प्रवासी; प्रशासनाच्या सुचनेनंतर मार्ग बदलला

श्रीरामपूर(प्रतिनिधी)- लॉकडाऊन काळात अडकलेल्या परप्रांतिय मजुरांना सोडण्याची व्यवस्था शासनाच्या माध्यमातून सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर काल मजुरांना गुजरातला सोडण्यासाठी श्रीरामपूर आगारातून निघालेल्या बस क्र.एम.एच.11 बीएन-9446 मध्ये सर्वच्या सर्व प्रवासी मध्यप्रदेशला जाण्यासाठी बसले. सदर बस लासलगाव नजीक आली असता गाडीतील काही सूज्ञ प्रवाशांना बस गुजरातच्या दिशेने चालल्याचे लक्षात येताच त्यांनी चालक व वाहकाला ही बाब निदर्शनास आणून दिली.

मात्र,आम्हाला गाडी मध्येच थांबवता येणार नाही, आम्हाला गुजरातला सोडण्याचा आदेश असल्याचे चालक-वाहकांनी सांगताच बसमधील प्रवाशांमध्ये चलबीचल सुरू झाली. संबंधित बस चालकाने आगार व्यवस्थापक व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यापासून गाडीचा मार्ग बदलून धुळे-शिरपूरमार्गे मध्यप्रदेशची बॉर्डर असलेल्या पळसनेरपर्यंत सदर प्रवासी सोडण्याचे आदेश प्राप्त होताच बसमधील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

- Advertisement -

काल दुपारी गुजरातमधील मजुरांना सोडण्यासाठी श्रीरामपूर आगारातून दुपारी अडीच वाजता बस सुटली. मात्र बसमध्ये बसलेले सर्वच्या सर्व 28 प्रवासी (महिला व पुरुष) तसेच 8 बालके हे सर्व मध्यप्रदेशचे नागरिक होते.मात्र, गाडी गुजरातसाठी सुटली याची कोणतीही कल्पना या प्रवाश्यांना नव्हती. या गाडीत मूळचे श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावचे रहिवासी पण सध्या व्यवसायानिमित्त मध्यप्रदेशमधील खांडवा येथे कुटुंबियांसह स्थायिक झालेले जालिंदर पिराजी धनवटे हे प्रवास करत होते.

सदर बस लासगावमार्गे चांदवड-सटाणा-तारापूरमार्गे नवापूर या गुजरातच्या सरहद्दीकडे जात असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने याबाबत वाहकाला विचारणा केली.सदर बस गुजरातसाठीच रवाना झाली असल्याचे वाहकाने सांगताच गाडीतील प्रवाशांमध्ये चलबीचल सुरू झाली. मात्र आम्ही तुम्हाला इतरत्र सोडू शकत नसल्याचे चालक-वाहकाने सांगताच प्रवाशांनी त्यांची विनवणी सुरू केली.

दरम्यान संबंधित चालक-वाहकांनी श्रीरामपूर आगाराशी संपर्क साधल्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांना सदर घटनेची कल्पना देण्यात आली.तोपर्यंत गाडी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे पोहचली होती. त्यांनी तातडीने गाडीचा मार्ग बदलण्याच्या सूचना केल्याने रात्री आठ वाजता सदर बस साक्रीहून धुळे-शिरपूरमार्गे मध्यप्रदेशची बॉर्डर असलेल्या पळसनेरकडे वळविण्यात येऊन पळसनेरपर्यंत या प्रवाशांना पोहच करण्याचे आदेश देण्यात आले.

बसमधील सर्व प्रवासी हे मजूर व अशिक्षित तसेच भाषेतील समन्वयाचा अभाव यामुळे शांत होते. मात्र जालिंदर धनवटे हे मूळचे महाराष्ट्रीयन असल्याने त्यांच्या प्रसंगावधानाने या परप्रांतिय मजुरांची होणारी परवड टळली असेच म्हणावे लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या