Monday, May 6, 2024
Homeनाशिककरोनामुळे रानमेव्याची उलाढाल झाली लॉकडाऊन; आदिवासींना लाखो रुपयांचा फटका

करोनामुळे रानमेव्याची उलाढाल झाली लॉकडाऊन; आदिवासींना लाखो रुपयांचा फटका

घोटी : तालुक्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात रानमेवा बहरला आहे. या भागातील करवंदाच्या जाळ्या लक्ष वेधून घेत आहेत.

दरवर्षी उन्हाळ्यातील एप्रिल- मे महिन्यात ही सर्व फळे बहरतात व बाजारात विक्रीसाठी आणली जातात. परंतु, यावर्षी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाढत असणाऱ्या लॉकडाऊनमुळे रानमेवा उपेक्षित राहिला आहे. महामंडळाच्या बसेस, खासगी वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने या रानमेव्यापासून आदीवासी बांधवांना हक्काचे मिळणारे लाखोचे उत्पन्न बुडाले आहे. त्यातच आता लॉकडाऊनमध्ये वाढ झाल्याने हा रानमेवा जंगलातच खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण बागलाण दिंडोरी या भागात सदाहरित झाडे आहेत त्यामुळेे हा भाग जैवविविधतेने नटलेला आहे. वसंत ऋतूची सुरुवात झाल्यानंतर लगेचच रानमेवा बहरायला सुरुवात होते. यामध्ये आंबा, जांभूळ, चिंच, फणस, करवंद यांचा समावेश होतो. या खोऱ्यात ही फळे मोठ्या प्रमाणात पिकतात. चैत्र महिन्याच्या सुरुवातीला या सर्वच फळांना पाड लागतात. ही फळे अत्यंत गुणकारी व चवदार असतात.

उन्हाळ्यात आंबा, कलिंगड, द्राक्ष खाण्याची जेवढी उत्सुकता असते तितकीच हा रानमेवा चाखण्याची आस लोकांना लागलेली असते. आडरानात कुठेही कसाही उगवणारा हा रानमेवा टोपल्याटोपल्यात भरुन बाजारात आणला की आपल्यालाही भुरळ पडल्याशिवाय राहात नाही.

दरवर्षी रानमेव्याच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असे. परंतु,यावर्षी करोनामुळे वाहतुकीच्या सर्व सोयीसुविधा बंद झाल्या. त्यामुळे जंगलात असणारा रानमेवा मुबलक असूनही लोकांपर्यंत पोचवता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे हातावर पोट असणाऱ्या महिला व त्यांच्या कुटुंबातील सदस्य पहाटे लवकर उठून हा रानमेवा जंगलातून आणतात. यानंतर रानमेव्याची विक्री ग्रामीण भागातील महिलांकडून केली जाते.

हंगामी रोजगारातून आमच्या कुटुंबाला हातभार लागतो. डोंगर दऱ्यातुन आम्ही शहरी भागात करवंदे, जांभळे, फणस व इतर रानमेवा विक्रीसाठी घेऊन जातो. यातून हक्काचे दोन पैसे मिळाल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्यास मदत होते हे आमचे रोजगाराचे साधनच आहे पण लॉकडाऊनमुळे वाहतूक पूर्ण थांबल्याने हक्काचा रोजगार पूर्ण बुडाला आहे.
– चंद्राबाई आगीवले ,पत्र्याचीवाडी इगतपुरी

- Advertisment -

ताज्या बातम्या