Friday, May 3, 2024
Homeनाशिकसिन्नर : चाकूचा धाक दाखवून बिअर बार व्यवस्थापकाला लुटले

सिन्नर : चाकूचा धाक दाखवून बिअर बार व्यवस्थापकाला लुटले

वावी : आज दि.२६ मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास वावी गावाजवळ असलेल्या साई प्रसाद बिअर बार परमिट रूमच्या व्यवस्थापकाला चाकूचा धाक दाखवत चौघांनी मारहाण केली. या घटनेत २० हजार हजार रुपयांची रोख रक्कम , २८ हजार रुपयांचा मद्याचा साठा व हॉटेलच्या बाहेर उभी असलेली मोटरसायकल चोरट्यांनी लांबविली

वावी गावाच्या पश्चिमेला दिलीप बाबुराव कपोते यांचे साईप्रसाद हॉटेल या नावाने बिअर बार परमिट रूम आहे. तेथील व्यवस्थापक माधव विठ्ठल हारक (६५) हे नेहमीप्रमाणे हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीत झोपले असताना दीड वाजेच्या सुमारास काळे कपडे परिधान केलेल्या व तोंड झाकलेल्या चार अनोळखी तरुणांनी खोलीच्या दुसर्‍या बाजूचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. हारक यांना जाग येण्यापूर्वीच या चौघांनी त्यांच्या डोक्यात काठीने प्रहार करून रक्तबंबाळ केले त्याच अवस्थेत त्यांची उचलबांगडी करून शेजारच्या खोलीत आणले. तेथेही मानेला सुरा लावून मारहाण केली.

- Advertisement -

त्यांच्याकडून हॉटेलच्या चाव्या जबरदस्तीने हिसकावून घेत जवळ असलेल्या रकमेची मागणी केली. जिवाच्या भीतीने हारक यांनी आपल्या जवळ असलेला हॉटेलचा वीस हजार रुपयांचा गल्ला चोरट्यांच्या स्वाधीन केला. हारक यांनी आरडाओरड करू नये म्हणून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून व हात-पाय बांधून चोरटे कुलूप उघडून हॉटेलमध्ये शिरले. येथे लाईट चालू करून आतमध्ये उचकापाचक करण्यात आली.

यावेळी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या मद्याचा साठा चोरट्यांच्या हाती लागला. विदेशी मद्याचे चार बॉक्स व बिअरचा एक बॉक्स मिळून २८ हजार रुपयांचे मद्य चोरट्यांनी हॉटेल बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या वाहनाकडे वाहून नेले. तर फ्रिजमध्ये ठेवलेल्या थंडगार बियर च्या १२ ते १५ थंडगार बाटल्यांचा त्यांनी आस्वाद घेतला. जाताना हारक यांचे मनगटी घड्याळ व मोबाईल फोन आणि बाहेर उभी होंडा कंपनीचे मोटरसायकल घेऊन चोरटे पसार झाले. हॉटेलमधील कुकर आणि मिक्सर बाहेर फेकून देण्यात आला.

त्यानंतर अडीच वाजेच्या सुमारास आपले हात पाय कसेबसे सोडवून हारक यांनी पोलीस ठाणे गाठले. कपोते यांना पोलिसांनी घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, हवालदार प्रवीण अडांगळे, उमेश खेडकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

सकाळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. हारक यांचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला असल्याने त्यादृष्टीने तपासाची दिशा निश्चित करत सहाय्यक निरीक्षक गलांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचना केल्या. कपोते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या