Monday, May 6, 2024
Homeनगरसाखर कामगार हॉस्पिटलवर ‘राजकीय’ डोळा

साखर कामगार हॉस्पिटलवर ‘राजकीय’ डोळा

कारभारातील हस्तक्षेपास ट्रस्टींचा विरोध : भीमराज देवकर

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कामगार नेते गंगाधर ओगले यांनी गोरगरीब जनतेसाठी साखर कामगार हॉस्पिटल उभारले. हॉस्पिटल उभारणीत कामगारांचा मोठा त्याग आहे. आता या हॉस्पिटलवर बड्या नेत्याचा ‘राजकीय’ डोळा आहे, असा आरोप करत हॉस्पिटलचा ताबा, कारभारात हस्तक्षेप करणार असतील तर सर्व ट्रस्टींचा त्याला पूर्णपणे विरोध राहील, असे ट्रस्टी भीमराज देवकर यांनी सांगितले.

- Advertisement -

पत्रकारांशी बोलताना देवकर म्हणाले, कामगार नेते अविनाश आपटे व ज्ञानदेव आहेर हे हॉस्पिटलचा कारभार चांगल्या प्रकारे पाहतात म्हणून आम्ही त्यात ढवळाढवळ करत नाही. म्हणून आपण हॉस्पिटलचे मालक आहोत अशा थाटात त्यांनी वागू नये. असाही टोला देवकर यांनी लगावला. जर असे असेल तर आम्हाला त्याचा वेगळा विचार करावा लागेल. हॉस्पिटलचे धोरण ठरविण्याचा अधिकार सर्व विश्वस्तांना आहे.

आमची आमदार राधाकृष्ण विखे यांना विनंती आहे की त्यांनी हॉस्पिटलच्या कारभारात हस्तक्षेप करू नये. दोन महिन्यांपूर्वी आमदार राधाकृष्ण विखे यांनी श्रीरामपूरमध्ये त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी श्रीरामपूरच्या पेशंटना लोणी किंवा विळदघाट येथे जाण्याची गरज नाही तर साखर कामगार हॉस्पिटलमध्ये आम्ही लक्ष घालू आमची त्याबाबत आपटे व डॉ. जगधने यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे असे सांगितले.

साखर कामगार हॉस्पिटलचा मी एक ट्रस्टी आहे. याबाबत आम्हास ट्रस्टी म्हणून कोणतीही कल्पना नाही. मी त्याबाबत गांभीर्याने विचार केला नाही. खा. डॉ. सुजय विखे यांनीही माहिती घेतली. दोन दिवसांपूर्वी आमदार विखे यांचे सिव्हील इंजिनियर येऊन हॉस्पिटल बिल्डिंग व परिसराची मोजमापे घेतल्याचे मला कळले. तेव्हा आमदार विखे यांचा हेतू काहीतरी वेगळा आहे याची मला शंका आली आपण साखर कारखान्यात नोकरीला असताना व सेवानिवृत्तीनंतरही साखर कामगार संघटनेत पूर्णपणे झोकून देऊन काम केले आहे.

कामगारांच्या पैशातून हे हॉस्पिटल उभे राहिले आहे. याचा मी साक्षीदार आहे. कोणत्याही साखर कारखान्याने हॉस्पिटल उभारणीला आर्थिक मदत केलेली नाही. स्व. जयंतराव ससाणे व स्व. गोविंदराव आदिक यांच्या व्यतिरिक्त कोणीही मदत केली नाही.

1987 साली हॉस्पिटलचे संस्थापक गंगाधर ओगले यांचे व्यवस्थापन असताना हॉस्पिटल बंद पडले व ते नगरपालिकेला चालविण्याचा ठराव केला. त्या ठरावास आम्ही संघटनेमार्फत विरोध करून महाराष्ट्राचे मुख्य धर्मादाय आयुक्त (मुंबई) यांच्याकडून स्थगिती हुकूम मिळवला. हॉस्पिटल तीन वर्षे बंद होते अखेर हॉस्पिटल कामगार संघटनेचे आहे.

हे धर्मादाय आयुक्त यांनी मान्य करून ट्रस्टने हॉस्पिटल स्वत:च चालवावे असा आदेश दिला. साखर कामगार सभेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेषतः अविनाश आपटे, ज्ञानदेव आहेर, महाराष्ट्र आरोग्य मंडळ (पुणे) यांच्या प्रमुख व हॉस्पिटल विश्वस्त डॉ. दादा गुजर यांनी स्वत: पुढाकार घेऊन हॉस्पिटल चालू केले.
त्यावेळी कोणत्याही साखर कारखान्याने मदत केली नाही. कामगार संघटनेने उभारलेले आशिया खंडातील हे एकमेव हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल हे स्वतःच्या कुवतीने अतिशय व्यवस्थित चालू असल्याचे देवकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या