Friday, May 3, 2024
HomeUncategorized‘अनलॉक’ झाल्यानंतर…

‘अनलॉक’ झाल्यानंतर…

जगभरात कोरोनाच्या प्रसारावर नजर टाकली असता असे दिसते की, हा आजार काही ठिकाणी अधिक तर काही ठिकाणी कमी घातक ठरला आहे. आशियाई देशांच्या तुलनेत पाश्चात्य देशांत कोविड-19 मुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अधिक आहे. भारतातील आरोग्य यंत्रणा पाश्चात्य देशांच्या तुलनेत खूपच पिछाडीवर आहे. परंतु त्या देशांच्या तुलनेत आपल्याकडे मृत्युदर खूपच कमी आहे. त्यामुळे काळजी घेतल्यास तसंच नियमांचे पालन केल्यास विषाणूंचे संक्रमण तीव्र होण्यापासून रोखता येऊ शकते.

 डॉ. रणदीप गुलेरिया, ‘एम्स’चे संचालक

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सामुदायिक रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) विकसित करण्यााचा सल्ला दिला जात आहे. परंतु असे करण्यात मोठी जोखीम आहे, असे मत विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) विश्लेषणांती मांडले आहे. संसर्ग पसरू नये यासाठी वेळेवर हस्तक्षेप हाच एकमेव पर्याय आहे. जेव्हा लोकसंख्येचा एक मोठा भाग विषाणूग्रस्त होतो तेव्हाच सामुदायिक रोगप्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते. कारण तोपर्यंत अनेकांना त्या आजाराची लागण होऊन ते त्यातून बरे झालेले असतात किंवा त्यांचे लसीकरण झालेले असते. जेव्हा हे घडते, तेव्हा प्रतिकारशक्ती नसलेल्या व्यक्तींमध्ये तो आजार पसरण्याची शक्यता कमी असते. या पार्श्वभूमीवर, भारतात सामुदायिक रोगप्रतिकारशक्तीचा प्रयोग करणे व्यवहार्य आहे का तसेच ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणजे काय आणि ती कशी काम करते, हे समजून घेणे आवश्यक आहे.

प्रथमतः कोणत्याही देशात असा प्रयोग करणे जोखमीचे असते. वस्तुतः जेव्हा एखाद्या देशाच्या लोकसंख्येपैकी साठ ते सत्तर टक्के लोकांना एखाद्या आजाराची लागण होते, तेव्हाच ‘हर्ड इम्युनिटी’चा परिणाम दिसू लागतो. कोणत्याही देशाने अशी जोखीम पत्करणे निश्चितच धोकादायक आहे. त्यामुळे विषाणूच्या प्रसाराच्या मार्गात हस्तक्षेप करण्याचे किंवा साखळी तोडण्याचेच धोरण कोणताही देश स्वीकारेल. जगभरात अनेकांनी कोरोनाच्या संकटाचा पूर्णतः नायनाट करण्यासाठी काही मॉडेल सैद्धांतिक स्वरूपात मांडली आहेत. भारतातही कोविड-19 चे काही टप्पे असू शकतील असे वाटते. बाधितांची संख्या कमी होत जाऊ शकते किंवा कोविड-19 ची दुसरी लाटसुद्धा येऊ शकते, हे गृहित धरून लोकांनी तयारीत राहण्याची गरज आहे.

- Advertisement -

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) या देशाच्या आरोग्यसेवेतील शीर्षस्थ संस्थेने कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी पंचसूत्री दृष्टिकोन स्वीकारला आहे. यात देखरेख, निदान आणि नव्या उपचारांच्या माध्यमांतून हस्तक्षेप, रुग्णालयांमधील साह्यभूत उपकरणे आणि पुरवठा साखळी यांचा समावेश आहे. लस विकसित करण्याच्या आघाडीवर तीन वेगवेगळे मार्ग अवलंबिले जात आहेत. प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त असलेली लस शोधून काढण्यासाठी देशातील तीन संस्थांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. दुसरा मार्ग मोनोक्लोनल अँटिबॉडी हा आहे. पुणे येथील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सच्या (एनसीसीएल) तसेच आयआयटी इंदौर आणि भारत बायोटेक यांच्या एकत्रित सहकार्यातून सुरू असलेल्या माध्यमातून ही लस विकसित करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यासाठी सीएसआयआर अर्थपुरवठा करीत आहे. प्लाज्मा थेरपी हा तिसरा पर्याय असून, कोलकता येथे त्यावर प्रयोग सुरू आहेत.

कोविड-19 च्या फैलावासंबंधी पूर्वानुमान व्यक्त करण्याचे गणितीय मॉडेल विकसित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विज्ञान आणि तंत्रज्ञान (डीएसटी) विभागाच्या मदतीने कोरोना विषाणूच्या प्रसारासंबंधी अंदाज बांधण्यासाठी गणिताच्या माध्यमातून एक सुपरमॉडेल तयार करण्याची योजना आखली आहे. धोरणकर्त्यांकडून त्यासाठी सहकार्य मिळू शकेल. गणिती पद्धतीने अंदाज लावण्याची काही गणिती मॉडेल देशातील सुमारे 20 समूहांकडे तयार आहेत. या सर्व मॉडेलमधील चांगल्या पैलूंची निवड करून एक सुपरमॉडेल तयार करण्याची ही योजना आहे. कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी विशेष निधी देण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ म्हणून गणितीय मॉडेल तयार करणार्या 10 समूहांना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने यापूर्वीच निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेअंतर्गत बेंगळुरू येथील जवाहरलाल नेहरू विज्ञान संशोधन केंद्र (जेएनसीएएसआरएस) आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएस) देशात कोविड-19 मॉडेल तयार करण्यासंबंधीच्या सर्व कार्यक्रमांशी संलग्न राहून त्यांच्यासोबत काम करण्यासाठी समन्वय प्रस्थापित करतील. यातून विविध मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी निकष तयार करण्यास आणि अंतिमतः ‘कोविड-19 भारत राष्ट्रीय सुपर मॉडेल’ सादर करण्यास मदत होईल. हे सुपर मॉडेल कोरोना विषाणूच्या विविध पैलूंसंबंधी पूर्वानुमान व्यक्त करण्यास मदत करू शकेल आणि त्याचा लाभ धोरणकर्त्यांना करून घेता येईल.

जगभरात कोरोनाच्या प्रसारावर नजर टाकली असता असे दिसते की, हा आजार काही ठिकाणी अधिक तर काही ठिकाणी कमी घातक ठरला आहे. आशियाई देशांच्या तुलनेत पाश्चात्य देशांत कोविड-19 मुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अधिक आहे. भारतातील आरोग्य यंत्रणा पाश्चात्य देशांच्या तुलनेत खूपच पिछाडीवर आहे. परंतु त्या देशांच्या तुलनेत आपल्याकडे मृत्युदर खूपच कमी आहे. त्यामुळे काळजी घेतल्यास तसंच नियमांचे पालन केल्यास विषाणूंचे संक्रमण तीव्र होण्यापासून रोखता येऊ शकते.

पाश्चात्य देशांमध्ये मृत्युदर अधिक असण्याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ वयस्क लोकांची संख्या अधिक असणे; परंतु असा तर्क दिल्यास ब्राझील आणि जपान अपवाद ठरतात. ब्राझीलमध्ये युवकांची संख्या जपानच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे. परंतु कोरोनामुळे तेथे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. जपानमध्ये वयोवृद्ध लोकांची संख्या प्रचंड असूनसुद्धा कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक हजाराच्या आत आहे. मृत्युदर अधिक असण्यास वयस्क लोकांची संख्या अधिक असणे हे कारण नाही, हे यावरून स्पष्ट होते. जपानमधील लोकांना स्वच्छता राखण्याची आणि मास्क लावण्याची सवय आहे. लोक हस्तांदोलन न करता एकमेकांना झुकून अभिवादन करतात. शिवाय सर्वांना आरोग्यसुविधा मिळतील अशी तरतूद जपानमध्ये आहे. वयस्कर लोकांची काळजी घेण्याची परंपरा तिथे आहे. कदाचित त्यामुळेच कोरोना जपानमध्ये अधिक नुकसान करू शकला नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, स्थूल व्यक्तींना कोविड-19 चा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. तसेच अन्य आजार असणार्यांनाही संसर्गाचा धोका जास्त असतो. यात उच्च रक्तदाब आणि मधुमेह या आजारांचा प्रामुख्याने समावेश आहे. अर्थात, कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून, त्यामुळे एवढ्या लवकर कोणताही निष्कर्ष काढण्याजोगी परिस्थिती नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

युरोपात कोरोनामुळे अधिक लोकांचा मृत्यू झाला, त्यात जनुकीय कारणांचाही समावेश आहे, असे अभ्यासातून दिसून आले आहे. कोरोनाचा विषाणू पेशींच्या पृष्ठभागावर असणार्या एसीई-2 रिसेप्टरवर चिकटून बसतो आणि संसर्ग पसरवितो. परंतु एसीई-1 जनुकांचे अस्तित्व एसीई-2 वर परिणाम करते. त्यामुळे एसीई-2 रिसेप्टरची संख्या कमी होत जाते आणि संसर्गाचा धोका कमी होतो. आकडेवारी पाहिल्यास लक्षात येते की, ज्या देशांतील लोकांमध्ये एसीई 1 जनुकांची संख्या कमी असते, त्या देशांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका आणि त्यामुळे होणार्या मृत्यूंची संख्या अधिक असते. युरोपात तसेच घडले आहे.

कोविड-19 च्या विषाणूने स्वतःचे स्वरूप बदलले (म्यूटेशन) आहे का, असा प्रश्न जगभरातील संशोधकांना पडला आहे. केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांच्या मते, आशियातून युरोपात पोहोचण्यापूर्वी कदाचित विषाणूने आपले स्वरूप बदलले असावे आणि तो अधिक धोकादायक बनला. या संशोधकांच्या मते, या विषाणूची तीन रूपे आहेत. त्यांना ए, बी आणि सी अशी नावे देण्यात आली आहेत. बी स्ट्रेनच्या (जात) विषाणूचा फैलाव पूर्व आशियात झाला आहे तर ए आणि सी स्ट्रेनच्या विषाणूने युरोप आणि अमेरिकेत हाहाकार उडवून दिला आहे. अर्थात विषाणूच्या वेगवेगळ्या स्वरूपाबद्दल पुरेशी माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. हवामान उष्ण असेल आणि हवेत आर्द्रता असेल, तर अशा ठिकाणी विषाणूचा प्रसार कमी प्रमाणात होतो तर थंड आणि शुष्क प्रदेशांत तो वेगाने पसरतो. त्याची संहारक क्षमता वाढते, असेही म्हटले गेले. कदाचित त्यामुळेच उष्ण हवामान असलेल्या आशियाई देशांच्या तुलनेत युरोप आणि अमेरिकेत विषाणूचा फैलाव बराच वेगाने झाला. अर्थात, उष्ण जलवायू असणार्या दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांत या विषाणूने हाहाकार माजविला आहे. परंतु दक्षिण गोलार्धात सध्या हिवाळा सुरू आहे, हेही त्यामागील कारण असू शकते.

लॉकडाउनचे कडक पालन करणे हेही संसर्ग कमी होण्याचे कारण असू शकते. स्वीडन, इराण आणि तुर्कस्तानात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी झाली नाही आणि या देशांमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. अर्थात, जपानमध्येही कडक निर्बंध घालण्यात आले नव्हते. परंतु तेथे मृत्युदर कमी आहे. भारतात सुरुवातीला 21 दिवसांचा कडक लॉकडाउन जारी करण्यात आला. परंतु लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात नागरिकांना बर्याच प्रमाणात सूट मिळाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली. रेमडेसिविर या विषाणुरोधी औषधाची विक्री करण्यास गिलियाड सायन्सेस या कंपनीला भारतात परवानगी देण्यात आली. रुग्णालयांत या औषधाचा वापर आणीबाणीच्या वेळी मर्यादित प्रमाणावर होईल. आणीबाणीच्या वेळी रेमडेसिविर हे औषध रुग्णाला जास्तीत जास्त पाच दिवस दिले जाईल. इतर देशांत दहा दिवसांसाठी हे औषध वापरण्याची परवानगी असताना भारतात मात्र ती पाच दिवसांसाठीच देण्यात आली आहे. हे औषध इंजेक्शनच्या माध्यमातून रुग्णाला दिले जाते. तज्ज्ञ डॉक्टरची चिठ्ठी असेल तरच हे औषध देण्याची परवानगी दुकानदारांना आहे. या औषधाचा वापर केवळ रुग्णालयात भर्ती असलेल्या रुग्णांवरच करता येतो. जपानमध्ये या औषधाच्या वापराला परवानगी असून, अमेरिकेत विशिष्ट रुग्णांसाठीच हे औषध वापरण्याची अनुमती देण्यात आली आहे.

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) सर्व राज्यांना सीरो सर्व्हे करण्याचा सल्ला दिला आहे. आयजीजी एलाइजा किटच्या साह्याने हे सर्वेक्षण केले जाते. विषाणूच्या संपर्कात किती लोक आले आहेत, हे त्यामुळे समजू शकते. सर्वसामान्य लोकसंख्येत आणि अतिसंवेदनशील (हाय रिस्क) समुदायात या विषाणूचा फैलाव किती झाला आहे, याचीही माहिती घेण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे. या किटच्या साह्याने चाचणी घेतल्यास किती लोकांमध्ये आयजीजी अँटिबॉडी तयार झाल्या आहेत, याची माहिती मिळू शकते. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूने किती लोक संसर्गित झाले होते, याचाही अंदाज येऊ शकेल. या चाचणीचा महत्त्वाचा फायदा असा की, ज्यांना लागण झाली; परंतु लक्षणेच दिसली नाहीत अशा रुग्णांची संख्या किती होती, हे आपल्याला समजू शकेल.

अँटिबॉडीची चाचणी आजार झाल्यानंतर पाच ते सात दिवसांत करणेच योग्य ठरते. कारण आजार झाल्यानंतरच अँटिबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. सीरो सर्व्हेच्या मदतीने लोकांच्या आरोग्याबद्दल अचूक माहिती मिळेल आणि त्याच्या मदतीने पुढील नियोजन करता येऊ शकेल. कोरोनाविरुद्ध कसे लढायचे याबद्दल अचूक माहिती कळेल आणि त्या आधारे आपण पुढील नियोजन करू शकू. कोरोनाशी कसे लढावे याचा मार्ग निश्चित करता येईल आणि धोरण तयार करतानाही त्याची मदत होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या