Friday, May 3, 2024
Homeब्लॉगम्हातारीशिवाय...!

म्हातारीशिवाय…!

माझ्या अवतीभवती घडणाऱ्या घटना, प्रसंग हे माझ्या कवितेसाठी कच्चा माल असतं. म्हणून प्रत्येक घटनेनंतर माझी कविता तयार असेल असे नाही. ते बीज पडून राहतं मनात. दिवस, महिने, वर्ष निघून जातात. मग कधीतरी त्या अर्ध्याकच्च्या ओळींचा कलकलाट मनात सुरू होतो. त्यांना पूर्णत्व हवं असतं. सतारीच्या तारा झंकाराव्यात तसा देह झंकारतो. आभाळ भरून यावं आणि थेंब पडावेत तसे शब्द पेनातून सांडतात. कविता आकार घ्यायला लागते.

माझ्या शेजारी एक कुटुंब रहायचं. शेत शिवाराची पार्श्वभूमी असलेलं. परंतु नोकरीच्या निमित्ताने शहरात येऊन स्थायिक झालेले. कुटुंबप्रमुखाशी माझ्या निरनिराळ्या विषयांवर गप्पा व्हायच्या. परंतु मुख्य विषय शेती, गाव, सण समारंभ, रितीरिवाज हाच असायचा. त्यांना गावाची फार ओढ होती. सुट्टी काढून ते गावाकडे जाऊन यायचे. आणि आल्यावर गावाकडचं भरभरून बोलत रहायचे. आजारपणात वडील गेल्यानंतर म्हातारी आई एकटीच गावाकडे राहत होती. ते आईचा उल्लेख म्हातारी असाच करायचे. इकडे शहरात त्यांची पत्नी आणि दोन गोजिरवाण्या मुलींना घेऊन ते रहायचे.

- Advertisement -

म्हाताऱ्या आईने आता इकडे शहरात येऊन आपल्याकडेच रहावं असं त्यांना मनोमन वाटायचं. तसा ते आईला आग्रहही करायचे. परंतु म्हातारीचं आयुष्य त्या मातीला चिकटलेलं. काहीबाही कारणं सांगून ती टाळत रहायची. दुःखी अंतःकरणाने ते शहरात परतायचे. माझ्याजवळ मन मोकळं करायचे. ‘म्हातारीशिवाय हे घर सुनंसुनं वाटतं’, हा सल त्यांना नेहमीच अस्वस्थ करायचा. त्यांच्या ‘म्हातारीशिवाय’ या शब्दाने मीही अस्वस्थ होत असे. तो शब्द मग माझा पाठलागच करू लागला. त्या शब्दाने मला खूप काही सांगितलं.

गाव, गावाकडची शेती, म्हाताऱ्याचं स्वप्न पूर्ण करू पाहणारी म्हातारी, मुलंबाळं, सुना नातवंडांनी गावाकडे यावं म्हणून वाटेवर डोळे लावून बसलेली म्हातारी अशा कितीतरी फ्रेम नजरेसमोरून सरकत गेल्या. काहींनी मला व्याकूळ केलं, रडवलं. माझ्यासाठी तेवढा कच्चा माल पुरेसा होता.

गावखेड्याकडचं हे सनातन दुःख आहे. ते मूक आहे. त्याला वाचा नाही. ते सालोसाल तिथेच आहे. आपल्या मर्यादेचा परिघ त्याने ओलांडलेला नाही. मुलं शिकतात मोठी होतात. शेतीची विपन्नावस्था पाहून ते नोकरीच्या निमित्ताने सरळ शहराला जवळ करतात. इकडे खेड्यात म्हातारा, म्हातारी एकटे-दुकटे त्यांची वाट पाहत राहतात. मुलं वेळच्यावेळी मनीऑर्डर पाठवतात.

म्हातारा-म्हातारीला तेवढंच नको असतं. त्यांना मुलांचं प्रेम हवं असतं. त्यांना नातवंडांना कुरवाळायचं असतं. त्यांचे लाड पुरवायचे असतात. आपण एकटे आहोत, आपली दखल कुणी घेत नाही या दुःखावर त्यांना मात करायची असते. आणि इकडे म्हातारीशिवाय सुन्या सुन्या वाटणाऱ्या घराला म्हातारीशिवाय जगण्याची हळूहळू सवय होऊन जाते. या विपरीत घटनेतच खरे तर कविता दडलेली असते.

‘म्हातारीशिवाय’ ही कविता लिहून आता खूप काळ लोटलाय. परंतु तिचा प्रभाव अजूनही तेवढाच आहे. अगदी कालपरवा अनुभवल्यासारखं मला ते वाटत राहतं. याचं एक कारण असं आहे की परिस्थिती आहे तशीच आहे. ती पुरेशी बदललेली नाही. आणि म्हणून ती कविता भूतकाळाची न राहता वर्तमानाची होऊन जाते. हे ‘ताटातुटीचे वर्तमान’ आहे. कविता लिहून झाली. सव्यसाची संपादक आनंद अंतरकरांनी त्यांच्या ‘हंस’ या दिवाळी अंकात आवर्जून छापली. नंतर ती ‘शरणागताचे स्तोत्र’ या कवितासंग्रहात समाविष्ट झाली. लोककवी प्रशांत मोरे यांनी आईच्या कवितांचे दोन खंड प्रकाशित केले. त्यातील पहिल्या खंडात त्या कवितेचा समावेश झाला. सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. दीपा क्षीरसागर यांनी संपादित केलेल्या ‘आई मराठी कवितेतील’ या प्रातिनिधीक कवितासंग्रहातही त्या कवितेला स्थान मिळालं. असं खूप मोठं भाग्य त्या कवितेच्या वाट्याला आलं. त्या भाग्याच्या पाऊलवाटेवर माझाही छानसा प्रवास झाला.

‘पोस्टमन इन द माऊंटन’ हा चिनी चित्रपट खूप दिवसांपासून पहायचा राहून गेला होता. नेटवरून डाऊनलोड करून लेकीने मला तो आवर्जून दाखवला. त्यातील एका प्रसंगाने मला खूप अस्वस्थ केलं. खूप खूप रडवलं. म्हातारा पोस्टमन आपल्या तरण्या मुलाला सोबत घेऊन दुर्गम, डोंगराळ प्रदेशात पत्रांचा बटवडा करीत हिंडतो आहे. पोस्टमन आता थकलाय. मुलाला प्रदेशाची, माणसांची, निसर्गाची ओळख करून देतोय. त्याला आता निवृत्त व्हायचंय. त्यांच्या नात्यांची गुंफण हुओ जियांकी या दिग्दर्शकाने फार सुंदर पद्धतीने चित्रीत केलेली आहे. पत्र वाटत वाटत ते दोघे एका म्हाताऱ्या स्त्रीच्या झोपडीसमोर येऊन उभे राहतात. म्हातारी दारातच बसलेली. कुणाचीतरी वाट पाहत. त्या दोघांच्या चाहुलीने ती सजग होते. पोस्टमन त्याच्या पिशवीतून एक लिफाफा काढून म्हातारीच्या हातात ठेवतो. म्हातारी ते पत्र डोळ्यांना लावते. छातीशी धरून ठेवते.

पत्र परत पोस्टमनच्या हातात देऊन टाकते. म्हातारी आंधळी असते. पोस्टमन वाचायला सुरूवात करतो. ते त्या म्हातारीच्या मुलाचं पत्र असतं. दूरदेशी गेलेल्या मुलाचं पत्र हाच तिच्या जगण्याचा आधार असतो. ख्यालीखुशालीचा मजकूर वाचता वाचता पोस्टमन म्हातारीच्या चेहऱ्यावर पसरत जाणाऱ्या समाधानाच्या रेषाही वाचत असतो. दूर उभा राहून हे सगळं न्याहाळणारा पोस्टमनचा मुलगा पोस्टमनच्या जवळ सरकतो. पत्र पाहून त्याला धक्काच बसतो. पत्र कोरं असतं. पोस्टमन मनातला मजकूर वाचत असतो. म्हातारीचा आधार उन्मळून पडू नये, म्हातारीचा मुलगा आता या जगात नाही हे म्हातारीला समजू नये, तिचे शेवटचे दिवस दुःखाने भरून जावू नयेत म्हणून पोस्टमनचा नित्यनेमाने नेटका प्रयास चालू असतो.

वाट पाहणं ही गोष्टच मोठी चटका लावणारी आहे. दुःख ही किती वैश्विक गोष्ट आहे, हे या चित्रपटाने अधोरेखित केलं. चिनी चित्रपटातल्या त्या म्हातारीमध्ये मला माझ्या शेजारच्या गृहस्थांची आई दिसली. मी माझ्याही आईला तिच्यात पाहिलं. जगातल्या बहुतांश आयांचं हे सनातन दुःख आहे. त्या दुःखाच्या दंशाने ‘म्हातारीशिवाय’ ही कविता माझ्याकडून लिहून घेतली. म्हणून मला ती अपूर्व वाटते.

म्हातारीशिवाय

म्हाताऱ्याच्या पाठीमागे

जमिनीची आबाळ होऊ नये म्हणून

म्हातारी हट्टानेच थांबली गावाकडे.

मुलांनी खूप केला आग्रह

परंतु

म्हातारीच्या डोळ्यात

म्हाताऱ्याचे अधुरे राहिलेले स्वप्न.

ती तिच्या निश्चयावर ठाम

मुलांना खूप वाईट वाटले

सुनांनी मात्र निःश्वास टाकले.

म्हातारी काटक

ती करीत राहिली तिचे, जमिनीचे…

तिने कसली स्वतःच्या हिमतीवर जमीन

परंतु

तिच्या एकटेपणाच्या रानाला

पडत गेल्या दीर्घ भेगा.

सुट्टीला जोडून होणाऱ्या मुलांच्या भेटीत

पडत गेला खंड.

सुना नातवंडांसहीत

घरी गावाकडे

साजरी व्हावी दिवाळी

म्हणून म्हातारी आसुसत राहिली.

नातेसंबंधात

पूर्वीइतकी उब न राहिल्याने

मुले होत गेली ‘फॉर्मल’

प्रेम, उत्कटता, माया

या गोष्टी

बनत गेल्या ‘कॅज्युअल’.

कष्ट करून करून

थकलेल्या म्हातारीला आता

हवाहवासा वाटतो आधार

मुलांचा, नातवंडांचा

ती अधीरपणे पाहत राहते वाट

आणि इकडे

म्हातारीशिवाय जगण्याची

मुलांना हळूहळू सवय झालेली.

– शशिकांत शिंदे (९८६०९०९१७९)

- Advertisment -

ताज्या बातम्या