Friday, May 3, 2024
Homeराजकीयनगराध्यक्षांवर आरोप करणारे देवळालीचे विरोधक कोठे गेले ?

नगराध्यक्षांवर आरोप करणारे देवळालीचे विरोधक कोठे गेले ?

देवळाली प्रवरा|वार्ताहर|Devlali Pravara

देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीत करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी कडक अंमलबजावणी करून शहरासह परिसराचे आरोग्य अबाधित ठेवले होते. त्यावेळी त्यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप करणारे आता कुठे गेले? असा सवाल देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केला आहे.

- Advertisement -

उपनगराध्यक्ष संसारे म्हणाले, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 22 मार्चपासून राज्यभर लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात सर्वात प्रभावीपणे लॉकडाऊन देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने माजी आ. चंद्रशेखर कदम व नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह सर्व नगरसेवकांनी सहभाग घेऊन राबविण्यात आला.

त्यावेळी विरोधकांनी त्यास प्रखर विरोध केला. चौक्यावर पहार्‍यावर असलेल्या कर्मचार्‍यांच्या अंगावर वाहन घालण्यापर्यंत व नगराध्यक्षांना अरेरावी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यावेळी नगराध्यक्षांवर हुकूमशाही करीत असल्याचे व मनमानी करीत असल्याचे खोटेनाटे आरोप करण्यात आले.

इथेच न थांबता विरोधकांच्या वतीने करोना व्यवस्थापन समितीवरून नगराध्यक्ष कदम यांना काढून टाकण्यासाठी तहसीलदारांना सह्यांचे निवेदन देखील देण्यात आले होते. त्यावेळी लॉकडाऊनच्या काळात बंद केलेली दुकाने उघडण्यासाठी पुढाकार घेणारी विरोधी मंडळी आता कुठे गेली? असा सवाल करून संसारे म्हणाले, पाच महिन्यांनंतर सुरक्षित असलेल्या देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीत करोनाचा प्रवेश झाला आहे.

आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. ही संख्या वाढू नये म्हणून आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बाधित परिसर सील केला जात आहे. आता मदत करण्यासाठी विरोधक बाहेर यायला तयार नाहीत. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठीच फक्त विरोधकांचा आटापिटा असतो, असे संसारे यांनी म्हणाले.

ही वेळ राजकारण करण्याची नसून जनतेला आधार व मदत करण्याची आहे. राजकीय मतभेद चालूच राहतील. त्यांनी राजकीय मतभेद विसरून या महामारीत पुढे येऊन नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी त्यावेळी आरोप करणार्‍यांनी आता पुढे येण्याची दानत दाखवावी, असे आवाहन संसारे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या