Sunday, May 19, 2024
Homeनगरतहसीलदार करोनात व्यस्त, तस्कर वाळू वाहण्यात मस्त !

तहसीलदार करोनात व्यस्त, तस्कर वाळू वाहण्यात मस्त !

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीपात्रातून होणार्‍या बेकायदेशीर वाळू वाहतुकीकडे महसूल अधिकार्‍यांचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. तहसीलदार करोनाच्या कामात व्यस्त असल्यामुळे वाळूतस्करांचे चांगलेच फावले आहे. रात्री 1 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नदी पात्रातून खुलेआम वाळू उपसा सुरू असतानाही याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीपात्रातून वेगवेगळ्या ठिकाणांहून वाळू उपसा केला जात आहे. नदी किनारी असणार्‍या गावांतून दररोज अनेक ट्रॅक्टर व इतर वाहनांमधून वाळूची वाहतूक होत असताना संबंधित गावातील मंडलाधिकारी व तलाठ्यांचेही या वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष होत आहे हे विशेष. महसूल खात्याचे अधिकारी सध्या करोनाच्या कामामध्ये व्यस्त असल्याने महसूल कर्मचार्‍यांचेही वाळू प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे.

संबंधित गावातील काही ग्रामस्थांनी प्रांताधिकार्‍यांकडे अनेकदा तक्रारी करूनही प्रांतधिकार्‍यांनीही याकडे दुर्लक्ष केले असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील गावांमधून सध्या वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. संगमनेर शहरातील प्रवरा नदीवरील मोठ्या पुलापर्यंत वाळू उचलली जात असल्याने नदी पात्रात मोठे खड्डे पडत आहेत. संगमनेरातील पर्यावरण प्रेमींनी प्रांतधिकार्‍यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधून वाळू उपसा थांबवण्याची मागणी केली होती. याबाबत आंदोलनाचा इशारा देऊनही अधिकार्‍यांनी पर्यावरण प्रेमीच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

धांदरफळ ते संगमनेर खुर्द पर्यंतच्या नदीपात्रात रात्री 12 वाजेनंतर वाळूतस्कर आपले काम सुरू करतात. या परिसरात दररोज रात्री 10 ते 12 ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक केली जाते. एक ट्रॅक्टर रात्रीतून किमान 7 ते 8 खेपा वाहत असतो. पहाटेपर्यंत ही वाळू तस्करी सुरू असते या भागातील रस्ते वाळू वाहतुकीमुळे खराब झाले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी संगमनेरच्या वाळू उपशात लक्ष घालावे व संबंधित कर्मचारी व वाळू वाहतूक करणार्‍यांना धडा शिकवावा, अशी मागणी या शेतकर्‍यांमधून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या