Thursday, May 2, 2024
Homeनगरकनगर, चिंचविहीरे, म्हैसगाव शिवारात अवैध खनिज उत्खनन

कनगर, चिंचविहीरे, म्हैसगाव शिवारात अवैध खनिज उत्खनन

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्याच्या पश्चिमेला असणार्‍या कनगर, चिंचविहीरे शिवारासह म्हैसगाव परिसरात बेकायदेशीररित्या हजारो गौणखनिजाचे उत्खनन सुरू आहे. शासकीय यंत्रणेला हाताशी धरून आणि शासनाचा वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून दिवसाकाठी हजारो ब्रास मुरूम डंपरच्या सहाय्याने अक्षरशः लुटून नेला जात आहे.

- Advertisement -

मुरूम तस्कर दिवसाढवळ्या गौणखनिजाची चोरी करून शासनाची बुडवणूक करीत असून महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. संबंधितांवर जिल्हाधिकार्‍यांनी दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा वाहने अडविण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

कनगर, चिंचविहीरे भागातून राहुरी तालुक्यातील चार ठेकेदार गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा मुरूमाची वाहतूक करीत आहेत. ही वाहने बेलगाम वेगाने जात असताना लगतच्या गावातील अनेक निष्पाप जिवांचे बळी गेले आहेत. मात्र, याबाबत राहुरीचे महसूल प्रशासन हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून आहे.

तर म्हैसगावमध्ये एकीकडे अवैध वाळू उपसा सुरू असताना गौणखनिजाचेही उत्खनन मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हैसगावला रस्त्यालगतच केदारेश्वर देवस्थान आहे. या रस्त्यावरून पाच-सहा ब्रास मुरूम भरलेला डंपर भरधाव वेगाने रस्त्याने जात असल्याने येथे अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या क्षेत्रातील डोंगराचे खुलेआम उत्खनन होत असून या भागात एकीकडे विद्युतपुरवठा करणारे विद्युत खांब तर एकीकडे मोठी खोल दरी आहे. अशा दुर्गम ठिकाणाहून हजारो ब्रास मुरूम डंपरच्या सहाय्याने चोरून नेण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, गावातील काहीजणांना हाताशी धरून हा उपसा जोरात सुरू आहे. परिणामी शासनाच्या हजारो रुपयांच्या महसुलावर पाणी फिरले जात आहे. महसूल कर्मचारी आणि यंत्रणेतील काही कर्मचारी व गावातील काही मंडळी यांचे आर्थिक लागेबांधे असल्यानेच सर्रासपणे मुरुमाचा उपसा केला जात आहे. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा र्‍हास होत असून, वेळीच कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

प्रशासनाला लाखोंचा चुना लावणारे मुरूम उत्खनन करणारे काही तस्कर प्रशासनाला कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता पाच ते सहा डंपरद्वारे मुरुमाची चोरी करीत आहेत. यात शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. मुरूम काढलेल्या भागात तेथील जागेची पाहणी करून नेमक्या किती रुपयांचा मुरूम उत्खनन झाला? याचा शोध महसूल विभागाने घेऊन दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या