Friday, May 3, 2024
Homeनगरअंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी 36 हजार 333 विद्यार्थ्यांची नोंदणी

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी 36 हजार 333 विद्यार्थ्यांची नोंदणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात आता पद्वी आणि पद्व्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहेत.

- Advertisement -

यासाठी महाविद्यालयांना परीक्षेची तयारी सुरू करावी लागणार आहे. जिल्ह्यात अंतिम परीक्षांसाठी 36 हजार 333 विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाकडे नोंदणी केलेली आहे. यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा महाविद्यालयांना घ्यावी लागणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने अंतिम परीक्षा होणारच असल्याचा निकाल दिला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनंतर सर्व विद्यापीठांनी परीक्षेबाबत वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना असून सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

त्या अनुषंगाने पुणे विद्यापीठांतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालयांनी ही परीक्षा घेण्याबाबत तयारी सुरू केली आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षेसाठी जूनमध्ये नगर जिल्ह्यातील 36 हजार 333 विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाकडे नोंदणी केलेले आहे.

यामध्ये 10 हजार 998 विद्यार्थी विज्ञान शाखेचे असून त्याखालोखाल 9 हजार 65 विद्यार्थी वाणिज्य व 8 हजार 156 विद्यार्थी कला शाखेचे आहेत. सर्वात कमी केवळ 740 विद्यार्थी औषधनिर्माणशास्त्र शाखेचे आहेत.

या 36 हजार 333 विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी जिल्ह्यातील महाविद्यालयांना करायची असून त्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग तसेच इतर शासकीय नियमांचे पालन करण्याच्या न्यायालयाच्या सूचना आहेत.

परीक्षेबाबत पुणे विद्यापीठाच्या सूचना आल्यानंतर त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यात 6 महाविद्यालये, तसेच 12 खासगी व सरकारी महाविद्यालयांची वसतिगृह कोव्हिड सेंटर म्हणून कार्यान्वित आहेत.

त्यामुळे परीक्षेसाठी महाविद्यालयांकडून या इमारती प्रशासनाला मागितल्या जातात की अन्य काही तोडगा निघतो याबाबत संबंधित महाविद्यालये भूमिका ठरवणार आहेत.

असे आहेत अंतिम वर्षाचे परीक्षार्थी

विज्ञान 10 हजार 998, कला 8 हजार 156, वाणिज्य 9 हजार 65, अभियांत्रिकी 3 हजार 977, शारिरिक शिक्षण 1 हजार 294, विधी 841, व्यवस्थान शास्त्र 1 हजार 262, औषध निर्माणशास्त्र 740 आणि एकूण 36 हजार 333.

- Advertisment -

ताज्या बातम्या