Friday, May 3, 2024
Homeनाशिकनातेवाईकांच्या गोंधळात मृतदेहांची अदलाबदल

नातेवाईकांच्या गोंधळात मृतदेहांची अदलाबदल

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या गोंधळात नजरचुकीने दोन मृतदेहांची अदलाबदली झाली. परंतु अंतविधीपुर्वीच ही बाब लक्षात आल्याने नातेवाईकांनी एकमेकांशी संपर्क करत रात्री उशिरा चांदवड टोलनाक्यावर मृतदेहांची पुन्हा आदलाबदल करून घेतल्याचा प्रकार शनिवारी (दि. २९) घडला.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयांमध्ये शनिवारी (दि. २९) दुपारी एकाच वयाच्या हृदयरोगाच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल झाले होतेे. त्यापैकी एक व्यक्ती द्वारका येथील राहणारी परंतु मुळची मध्यप्रदेश येथील होती. तर दुसरी व्यक्ती व्यक्ती अंबड परिसरातील होती.

मध्यप्रदेश येथील व्यक्तीचे शवविच्छेदन होऊन दुपारी दिड वाजता सर्व कागदपत्रांची पुर्तता करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला होता. परंतु ऍम्बुन्स न मिळाल्याने शवगृहाबाहेर स्ट्रेचरवर मृतदेह ठेवून ते ऍम्बुलन्सची वाट पाहत होते. अंबड येथील दुसर्‍या व्यक्तीचे शवविच्छेदन पुर्ण करून वैद्यकीय अधिकार्‍यांनी हा मृतदेह सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

त्यांनी तो ऍम्बुलन्स चालकाकडे ठेवून इतर पुर्तता करत होते. तोही मृतदेह बाहेरील स्ट्रेचवर ठेवण्यात आला होता. दरम्यान उशिर झाल्याने मध्यप्रदेश येथील व्यक्तीच्या नातेवाईकांनी गडबड करत नजरचुकीने अंबड येथील व्यक्तीचा मृतदेह उचलून ऍम्बुलन्सद्वारे ते निघुन गेले.

दुसरा ऍम्बुलन्स चालक तेथे पोहचल्यानंतर त्यांच्या लक्षात हा गोंधळ आला. त्याने तातडीने नातेवाईकांना दुरध्वनी करून ही बाब निदर्शनास आणली. तो पर्यंत मध्यप्रदेशकडे मृतदेह घेऊन निघालेले नातेवाईक धुळेजवळ पोहचले होते.

त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर ते तेथून पुन्हा माघरी फिरले तर दुसरा ऍम्बुलन्स चालक त्यांचा मृतदेह घेऊन तिकडे गेला. दरम्यान, त्यांची भेट चांदवड टोलनाका परिसरात झाली. रात्री उशिरा पुन्हा मृतदेहांची अदलाबदल करून उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाणपत्र व शव पोलिसांकडे व नातेवाईकांकडे मृतदेहाची ओळख पटवून मगच दिले जाते. या दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर ओळख पटवून दिल्यानंतर पोलिस व नातेवाईक यांच्याकडे देण्यात आलेले होते व तशी नोंद आमच्याकडे आहे. तब्बल पाच तासांच्या कालावधीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिलेल्या मृतदेहांमध्ये नातेवाईकांमुळे अदलाबदल झाली. त्यांना ती मान्य आहे. यात जिल्हा रुग्णालयाचा काहीही एक संबंध नाही.

– डॉ. आनंद पवार, शवविच्छेदन तज्ञ

सदर मृतदेह नातेवाईकांच्या चुकिमुळे वेगवेगळ्या अँम्बुलन्स मध्ये ठेवण्यात आले व त्यांना स्वतः ची चूक लक्षात आल्यावर त्यांनीच परस्परांशी संपर्क करुन मृतदेह नंतर अदलाबदल केले. तशी कबुली नातेवाईक व अँम्बुलन्स चालकांनी देखील दिली आहे. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाच्या प्रशासनाची यात कोणतीही चूक नाही.

– डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय

- Advertisment -

ताज्या बातम्या