अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar
अभिनेत्री कंगणा राणावतच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने गुरूवारी दुपारी तिच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारून दहन केल्याचाप्रकार शिवसैनिकांच्या अंगलट आला आहे.
शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह 19 शिवसैनिकांविरूद्ध प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक अजय गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल झाल्यामध्ये शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक योगीराज गाडे, अमोल यवले, विजय पठारे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, शशिकांत देशमुख, बापु कावरे, संग्राम कोतकर, अभिषेक भोसले, अक्षय कातोरे, विशाल गायकवाड व इतर पाच ते सहा शिवसेनेचे कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
चित्रपट अभिनेत्री कंगणा राणावतने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने राज्यातील जनतेच्या भावना दुखविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथे गुरूवारी दुपारी बारा वाजता अभिनेत्री कंगणाच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारून दहन करण्यात आले.
यासाठी प्रशासनाची कोणत्याही प्रकारची पुर्व परवाणगी घेतली नव्हती. तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला, म्हणून तोफखाना पोलिसांनी 19 शिवसैनिकांविरूद्ध भादंवि 269, 270, 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.