Friday, May 3, 2024
Homeधुळेशिरपूर : वाहनांसह 30 लाखांचे चोरीचे पार्टस जप्त

शिरपूर : वाहनांसह 30 लाखांचे चोरीचे पार्टस जप्त

शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :

बनावट पावतीच्या आधारे धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्हयात चोरी झालेल्या ट्रकचे तसेच इतर वाहनांचे सुटे स्पेअर पार्टस् घेऊन जाणार्‍या तीन वाहनांना शिरपूर शहर पोलिसांनी पकडले.

- Advertisement -

तीन वाहनांसह 30 लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.धुळ्याकडून शिरपूरकडे मालट्रक वाहनात चोरीच्या ट्रकचे व वाहनांचे सुटे पार्टस् भरून त्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना मिळाली.

शिरपूर टोलनाका येथे शहर पोलिसांनी सापळा रचून संशयित ट्रक थांबवून चौकशी करीत वाहनाची तपासणी केली होती.

सदर वाहनामध्ये असलेला माल हा मागील दोन वर्षाचे काळात धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्हयात चोरी झालेल्या ट्रक तसेच इतर वाहनांचे सुटे स्पेअर पार्टस् त्यांचे वाहनात भरून त्या मालाबाबत खोटे कागदपत्र तयार करून सदरचा माल विक्री करण्याचे उददेशाने वाहतूक होत असल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी पोकॉ महेंद्र सपकाळ यांनी दि.12 सप्टेंबर रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात चालक ट्रक क्र. आर जे 09 जीए 5485 चा चालक राजू लाल सेन (वय 22 रा.मोतीपूरा ता.बेहगुण जि. चितोडगड राजस्थान), ट्रक क्र. एम एच 04 जिजे- 7874 चा चालक रईस खान हनीब खान (32 रा.मार्केट वॉल पारोळा रोड धुळे) व ट्रक क्र. एम एच 18 एम 2545 चा चालक फिरोजखान अहमद खान (वय 36, वडजाई रोड, गफुर नगर गेट जवळ, धुळे) व सहचालक आसिफ खान नासिर खान (वय 18, कबिरगंज धुळे) आणि वाहनात माल भरून पाठविणारे, माल घेणारे व ट्रान्सपोर्टर अशांविरुध्द् भादंवि 379, 465, 468, 471,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोहेकॉ रामकृष्ण मोरे, पोकॉ महेंद्र सपकाळ, बी.बी.पाटील, हरून शेख यांनी सायंकाळी शिरपूर टोलनाका येथे सापळा रचून 6 वाजता संशयित मालट्रक आरजे-09 जीए- 5485 थांबवून चौकशी व तपासणी करीत 10 लाखाचा मालट्रक सह 9 लाख 44 हजार रुपये किमतीचा भंगार( तोडलेल्या वाहनाचे स्पेअर स्पार्ट) असा एकूण 19 लाख 44 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

तर पुन्हा त्याच दिवशी त्याच ठिकाणी रात्री 11.30 संशयित माल ट्रक क्र.एम एच-04 जिजे- 7874 हिची चौकशी व तपासणी करीत 7 लाख रुपये किमतीचा मालट्रक सह चार लाख रुपये किमतीचे भंगार ( तोडलेल्या वाहनाचे स्पेअर स्पार्ट) असा 11 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्याच ठिकाणी पुन्हा दि. 7 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास सदर पथकाने सापळा रचत संशयित मालट्रक क्र. एम एच 18 एम 2545 थांबवून चौकशी व तपासणी करीत 6 लाखाचा मालट्रकसह सह चार लाख रुपये किमतीचे भंगार (तोडलेल्या वाहनाचे स्पेअर स्पार्ट) असा 10 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

अशा या वेगळ्या कारवायांमध्ये शिरपूर पोलिसांनी 23 लाखांच्या वाहनांसह 17 लाख 44 हजार रुपये किमतीचे भंगार (तोडलेल्या वाहनाचे स्पेअर स्पार्ट) असा एकूण 30 लाख 44 हजार रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या