Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर; ठिकठिकाणी ठिय्या

नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर; ठिकठिकाणी ठिय्या

नाशिक | प्रतिनिधी

कांद्या थोड्याच दिवसांत तीन ते साडेतीन हजार प्रती क्विटलचा टप्पा ओलांडल्याने अचानक केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांद्याची निर्यातबंदी केली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजारात कांदा गडगडला आहे.

- Advertisement -

निर्यातबंदीचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतकरी बाजार समितीच्या बाहेर येऊन ठिय्या आंदोलन करत आहेत. अनेक संघटनांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत केंद्राच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये 45 टक्क्यानी वाढ झाल्याने वाणिज्य मंत्रालयाचे महासंचालक अमित यादव यांनी निर्यातबंदीचा निर्णय घेतला.

संपूर्ण देशामध्ये करोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असताना या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची भिती निर्माण झाली आहे.

सहा महिन्यातच कांदा निर्यातबंदी लादल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. फक्त शहरी ग्राहकाला खुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची टीका बळीराजाकडून केली जात आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव तीन हजार रुपयांवर गेले आणि केंद्र सरकारने निर्यात होणारा कांदा हा मुंबई पोर्टवर तर बांगलादेश सीमेवर दिवसभर रोखून धरल्याने या अघोषित निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना फटका बसला आहे.

यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने तत्काळ निर्यात पूर्ववत सुरू ठेवावी आणि कांद्याच्या बाजारभाव कोसळतील असे कुठलेही निर्बंध लादू नये अशी मागणी करत जिल्हाभरात निदर्शने केली.

लासलगाव, मुंगसे, पिंपळगाव, अभोणा, कळवण, नामपूर, सटाणा या ठिकाणी मुख्य बाजार आवारात शेतकऱ्यांनी ठिय्या मांडत निषेध केला आहे.

नांदगाव तालुक्यातील बोलठाण याठिकाणीदेखील शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

तिकडे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार असलेल्या नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांनी औरंगाबाद अहवा राज्य महामार्गावर केंद्र सरकारने अघोषित निर्यात बंदी केल्याने शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या