Friday, May 3, 2024
Homeनाशिक‘आयटीआय’ प्रवेश स्थगित

‘आयटीआय’ प्रवेश स्थगित

नाशिक । प्रतिनिधी Nashik

न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे आयटीआय प्रवेशाची दुसरी फेरी स्थगित करण्यात आल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) दिली आहे.

- Advertisement -

राज्यातील आयटीआय प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या दुप्पट अर्ज आले आहेत. यंदा 3 लाख 24 हजार 863 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 88 हजार 60 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले होते. मात्र, त्यातील 27 हजार 322 विद्यार्थ्यांंनी आपली प्रवेशनिश्चिती केली आहे.

त्यात शासकीय आयटीआयमध्ये 29.43 टक्के, तर खासगी आयटीआयमध्ये 38.46 टक्के प्रवेश झाले आहेत. पहिल्या फेरीतील प्रवेशाचे एकूण प्रमाण 31.03 टक्के आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे अकरावी आणि इतर प्रवेश प्रक्रियांप्रमाणे आयटीआय प्रवेश प्रक्रियाही तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.

राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घेतल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नवीन अर्ज भरण्याची आणि अर्जात बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे.

प्रवेश अर्ज दुरुस्ती

प्रथम प्रवेश फेरीत प्रवेशीत उमेदवारांव्यतिरीक्त सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रवेश अर्जात सादर केलेल्या माहितीत दुरुस्ती करण्यासाठी दि. 17 ते 20 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश करुन admission activities – Grievance Redressal/ Edit application Form येथे क्लिक करावे. कोणत्याही प्रकारे अडचण असल्यास नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था वा Help Lineवर संपर्क साधावा. प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचे डीव्हीइटीने कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या