Thursday, May 2, 2024
Homeधुळेमहावितरण कंपनीच्या कर्मचार्‍याला मारहाण

महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍याला मारहाण

शिंदखेडा – Shindkheda – प्रतिनिधी :

वीज पुरवठा खंडीत का केला? या वादातून दलवाडे येथे महावितरण सब डिव्हीजनच्या कर्मचार्‍याला कार्यालयात कार्यरत असतांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

- Advertisement -

कार्यालयातील खुर्ची अंगावर फेकली. महत्वाचे दैनंदिन रजिस्टर फाडून टाकले व इतर साहित्यांची तोडफोड केली.

परंतू याबाबत गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे महावितरणाच्या कर्मचार्‍यांनी पोलीस ठाण्यात आवारात निदर्शने केली. त्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे येथील वीज वितरण कंपनीचे सब डिव्हीजनचे कार्यालय आहे. या कार्यालयात निलेशकुमार बाबुलाल परमार हे कार्यरत आहेत. ते रात्री ड्युटीवर असतांना वीज पुरवठा खंडीत झाला.

याबाबत विरदेल येथील अनिल शिवाजी बेहरे याने दलवाडे येथील वीज कंपनीच्या कार्यालयात फोन केला. त्यावेळी तांत्रिक बाबीमुळे वीज गेली आहे असे परमार यांनी सांगितले.

त्यावेळी अनिल बेहेरे याने परमार यांच्याशी शाब्दिक वाद घालून शिवीगाळ केली. व त्यानंतर अनिल बेहरे आणि त्याचे चार ते पाच साथीदार दलवाडे येथील कार्यालयात आले. व त्यांनी पुन्हा परमार यांच्याशी वाद घालून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कार्यालयातील खुर्ची अंगावर फेकून मारली.

महत्वाचे दैनंदिन रजिस्टर फाडून टाकले. आणि इतर साहित्यांची तोडफोड केली. त्यानंतर अनिल बेहरे आणि त्याचे साथीदार तेथून निघून गेले.

कर्मचार्‍याला मारहाण व कार्यालयाचे तोडफोड केल्यामुळे परमार आणि संघटनेचे पदाधिकारी शिंदखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले.

परंतू त्यांना तीन ते चार तास ताटकळत बसवून ठेवले. पोलीसांच्या या भूमिकेमुळे कामगार संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले.

कामगार संघटना, वर्कर्स फेडरेशन, विद्युत ऑपरेटर संघटना, बहुजन फोरम, वीज तांत्रिक संघटना, वीज कृती समिती यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले. शेकडो जणांचा जमाव जमा झाला. गुन्हा दाखल केला जात नसल्यामुळे यावेळी निदर्शने करण्यात आली.

त्यानंतर अनिल शिवाजी बेहरे आणि पाच जण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जावून पंचनामा केला.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी हे करीत आहेत. अद्याप अनिल बेहरे आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या