Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयशिवसेना वादात युवा सेनेचीही उडी

शिवसेना वादात युवा सेनेचीही उडी

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

शिवसेनेच्या गटबाजीच्या राजकारणात आता युवा सेनेनेही उडी घेतली आहे. युवा सेनेचे प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व युवा सेनेचे प्रमुख मंत्री अदित्य ठाकरे यांना पत्र लिहून नगरमधील गटबाजी संपुष्टात आणण्याची मागणी केली आहे. महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक असतानाही भाजप-राष्ट्रवादीतील सेटलमेंट राजकारणामुळे शिवसेनेला सत्तेपासून दूर रहावे लागल्याचेही पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर नगर शहर शिवसेनेतील गटाबाजी जोरदार उफळून आली आहे. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडली जात नाही. आता युवासेनेचे शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी थेट ठाकरे पिता-पुत्रांना पत्र लिहित गटबाजीवर भाष्य केले आहे.

महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा सभापती होण्यास मोठी संधी होती. महापालिकेत शिवसेना एक नंबरचा पक्ष असतानाही राष्ट्रवादीने भाजपातून उमेदवार आयात करुन सभापतीपदी भाजपाकडून निवडून आलेला उमेदवार बसविला. शिवसेनेचे सभापती पद हुकले ही सामान्य शिवसैनिकांसाठी मोठी दुःखाची बाब असल्याचे कोतकर यांनी पत्रात म्हटले आहे.

गत दोन वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असून युवासेनेच्या नगर शहर प्रमुखपदी कार्यरत आहेत. गत दोन वर्षांपासून शिवसेना, युवासेना वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. कामरगाव, केडगाव येथे पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले आहेत. युवा सेनेच्या शाखाही स्थापन केल्या आहेत. दिवंगत अनिलभैय्या राठोड यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीत 24 नगरसेवक निवडून आले. शिवसेना महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरला. परंतू, भाजपा-राष्ट्रवादीच्या सेटलमेंट राजकारणामुळे शिवसेनेला सत्तेपासून दूर रहावे लागले. अगदी विरोधी पक्ष नेते पदाचा हक्क असतानाही तोही मिळू शकला नाही.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्याचे पडसाद नगरमध्ये उमटून येथेही सत्तापालट होईल असे वाटत होते, पण तेही झाले नाही. दिवगंत राठोड यांनी 25 वर्षे नगर शहरावर शिवसेनेचा भगवा डामडौलात फडकवित ठेवला. काही वर्षांपासून शिवसेनातंर्गत गटातटाचे राजकारण सुरु झाल्याने शिवसेनेची ताकद विखुरली जात आहे. याचा फायदा विरोधक उठवत आहेत. आजही महापालिकेत शिवसेनेचे 23 नगरसेवक आहेत. उपनेते अनिल राठोड यांच्या हयातीत शिवसेनेला एक खंबीर नेतृत्व होते. त्यांच्या अकाली निधनानंतर गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. याचा फटका सामान्य शिवसैनिकांना पर्यायाने शिवसेनेला बसत आहे. नगरमध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे. परंतू गटातटाच्या राजकारणामुळे कट्टर शिवसैनिक दुखावला जात आहे. वरिष्ठ पातळीवर याची वेळीच दखल घेवून योग्य ते पाऊल उचलावेत. भविष्यातही असेच गटातटाचे राजकारण सुरु राहिल्यास शिवसेनेला याची मोठी किंमत मोजावी लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही, वेळीच वरिष्ठांनी लक्ष घालावे, अशी मागणी कोतकर यांनी पत्रात केली आहे.

अडचण संपेलच असे नाहीे

महापालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ पाहता आगामी महापौर पद मिळून महापालिकेवर भगवा फडकेल असे वाटते. पण शिवसेनेकडे संख्याबळ, हक्क असतानाही गटातटाच्या राजकारणामुळे आडकाठी येवू शकते, अशी शंका कोतकर यांनी पत्रात व्यक्त केली आहे. नगर शहरातील शिवसेनेतंर्गत झालेली दुफळी रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन हालचाली कराव्यात असे कोतकर यांनी पत्रात म्हटले आहे.

कानामागून आले अन् तिखट झाले – श्रीराम येंडे; शिवसेनेतील गटबाजीवर भाष्य

1985 ते 95 या काळात उपाशी पोटी रक्ताचा पाणी करून शहरात शिवसेना रुजविली. आता गटबाजी करणारे कानामागून आले अन् तिखट झाले असे सांगत देवापुढच्या नैवेद्यासाठी अर्थात सत्तेसाठी हे सारं काही सुरू असल्याचा आरोप ज्येष्ठ शिवसैनिक श्रीराम येंडे यांनी केला आहे.

येंडे यांनी स्वत: ’नगर टाइम्स’शी संपर्क साधत गटबाजीवर प्रतिक्रिया दिली. 1985 मध्ये मी स्वत:, दिवंगत अनिल राठोड, शरद गायकवाड  आणि बोरा अशा चौघांनी शिवसेना संघटना वाढविण्यास सुरूवात केली. उपाशी पोटी दिवस काढत शिवसेनेचे रोपटं वाढविले. तेव्हासारखी हिंम्मत आताच्या शिवसैनिकांत दिसत नाही. सत्ता भोगण्यापुरते हे पुढं आले आहेत. दुकानदारी सुरू असून तळहाताच्या फोडाला जपावं तसं आम्ही शिवसेना जपली, वाढविली. आता शिवसेनेची गत पाहून मन अस्वस्थ होत असल्याचे येंडे म्हणाले.

महापालिकेतील सत्तेसाठी गटबाजी सुरू आहे. त्यांना सत्तेचा नैवद्य खायचा आहे. पक्षाचे यांना काही पडलेले नाही. त्यामुळेच ते आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना बोलवित नाही, काही सांगत नाहीत अशी खंत येंडे यांनी व्यक्त केली.

शिवसेनेतील गटबाजीवर अंबादास पंधाडे यांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे. शिवसेना संघटना नावारुपाला आली आहे. ती अशीच टिकवून आणखी पुढे न्यायची असेल तर गटतट बाजुला सारून एकत्र आले पाहिजे. जुन्या शिवसैनिकांनाही विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. तरच शिवसेनेला यापेक्षा आणखी चांगले दिवस नगर शहरात येतील असा विश्वास येंडे यांनी व्यक्त केला. काल आलेले नेते झाले अन् उड्या मारयाला लागले अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या