Thursday, May 2, 2024
Homeराजकीयमतदारसंघात पवारांनी स्वतःचेच उद्योग धंदे वाढवले

मतदारसंघात पवारांनी स्वतःचेच उद्योग धंदे वाढवले

जामखेड | तालुका प्रतिनिधी | Jamkhed

एक वर्ष पूर्ण होऊनही मतदारसंघात एकही विकास काम व उद्योग धंदे आणले नाहीत मात्र पवार यांनी स्वतःचेच उद्योग धंदे वाढवले व जनतेला वेढ्यात काढले. निवडणुकी दरम्यान घोषणा केलेला बारामती पॅटर्न म्हणजे निव्वळ भुलभुलैया आहे. अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांच्यावर केली.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारच्या विधानसभा निवडणुकीच्या वर्षपुर्ती निमित्ताने जामखेड तालुक्याने काय कमावले काय गमावले या निमित्ताने माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी जामखेड येथे शनिवार दि २४ रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीला नुकतेच एक वर्ष झालं. मात्र गेल्या वर्षभरात कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात एकही असे भरीव काम दिसुन आले नाही असा आरोप करीत प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी चे आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. गेल्या वर्षभरात आमदार रोहित पवार यांची कारकीर्द कशी राहिली, याचा लेखाजोखा मतदारांनी घेतला पाहिजे असे सांगून शिंदे म्हणाले की, ‘गेल्या वर्षभरात या मतदारसंघातील मतदारांनी आपले सर्वस्व गमावले आहे. निवडणुकीच्या तोंडावर जामखेडला एका महीन्यात कुकडीचे पाणी व एम आय डी सी येणार होती ती आता कुठे गेली ? गेल्या वर्षभरात एकही विकास काम झाले नाही मात्र मंजूर झालेल्या विकास कामाचे श्रेय लाटण्यात रोहित पवार हे पटाईत आहेत. खर्डा चौक ते लक्ष्मी चौकापर्यंत मी मंजूर केलेले काम अद्यापही होऊ शकले नाही. निवडणूकी अगोदर पाण्याचे शंभर टँकर सुरू केले. मात्र ते या वर्षीच्या उन्हाळ्यातील टंचाई मध्ये कोठे गेले? पवार हे फक्त फोडाफोडीचे राजकारण करतात. गोरगरिबांना सोशल डिस्टन्सिंग चा कडक नियम होता मात्र आमदारांना बारामती येथुन जामखेड येऊनही हा नियम नव्हता. कोरोना महामारी मध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील मुलांना वेठीस धरण्याचे काम केले. तालुक्यातील नागरिकांनी आरोळे हॉस्पिटल येथील कोविड सेंटर आर्थिक मदतीच्या माध्यमातून उभारले मात्र रोहित पवार यांनी स्वखर्चातून कोविड सेंटर उभे केले नाही. महाविकास आघाडीने युती सरकारच्या काळातील अनेक योजना बंद केल्या. सोशल मिडीया च्या माध्यमातून स्वतःचे बी बियाणे, कोंबड्यांची पील्ले, माशांची पिल्ले विक्रीचा व्यवसाय वाढवला. मतदारसंघात शेतीसाठी पाणी आणने तर दुरच पण पावसाच्या पाण्याचे जलपुजन केले. महीला बचत गटांवर दबाव टाकुन त्यांना हायजॅक करण्याचे काम सुरू आहे. करोना काळात भाजप नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले मात्र आमदार व तहसीलदार एका गाडीत फीरुन सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा उडवला त्यावर काही कारवाई केली गेली नाही. असा गंभीर आरोप देखील राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केला. लवकरच पुन्हा येणार्‍या ग्रामपंचायत, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या कामांना लागायचे आसुन या सर्व ठिकाणी भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या