Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्यापरस्पर जमीनींची विक्री करणारी टोळी जेरबंद; मूंबईनाका पोलिसांची कामगिरी

परस्पर जमीनींची विक्री करणारी टोळी जेरबंद; मूंबईनाका पोलिसांची कामगिरी

नाशिक ।प्रतिनिधी

मालकांच्या परस्पर दुसरी व्यक्ती उभी करून जमिनींचे बनावट कागदपत्र बनवुन विक्री करणार्‍या नाशिक मधील टोळीस मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे…

- Advertisement -

बापु राजाराम सोनवणे (रा. खर्डे, ता. देवळा, जि. नाशिक), प्रफुल्ल कैलास आहेर (26, रा.रासबिहारी रोड, पंचवटी), मंगेश रामदास अहिरे (32, रा. पंचवटी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

नाशिक व नव्याने विकसीत होत असलेल्या उपनगरीय भागात पडीत जमीनी तसेच मालकांचे दुर्लक्ष असलेल्या जमीनींवर डोळा ठेवून त्यांचे व्यवहार करण्याचा उद्योग समोर येत आहे. या प्रकरणी प्रकाश एकनाथ चौधरी (60, रा. मालेगाव) यांनी तक्रार दिली होती.

त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी गुंतवणुक म्हणुन अमृतधाम परीसरात जागा खेरीदी केली होती. सेवानिवृत्तीनंतर ते मालेगांव येथे वास्तव्यास गेले.

त्यादरम्यान, संशयितांनी चौधरी यांच्या नावाचा तोतया व्यक्ती उभा करून चौधरी यांच्या नावानेच बनावट पॅनकार्ड, मतदान कार्ड, बँक खाते उघडले व चौधरी यांचा प्लॉट परस्पर विक्री केला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करुन बापु सोनवणे, प्रफुल्ल आहेर, मंगेश अहिरे यांना अटक केली.

तर त्यांचा एक साथीदार राजेंद्र पंडीतराव जगताप यास आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपासात या टोळीतील संशयितांनी मृत जागा मालक किंवा शहराबाहेर राहणार्‍या जागा मालकांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करुन जागा बळकावल्याचे तसेच जागेची परस्पर इतरांना विक्री केल्याचे समोर आले आहे.

प्रफुल्ल आहेर हा मुख्य संशयित आरोपी आहे. तसेच या टोळीतील हिरामण गुंबाडे उर्फ टक्या हा फरार असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या टोळीविरोधात मुंबई नाका, सरकारवाडा, आडगांव व अंबड पोलीस ठाणे येथेही जागा व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

नाशिक व नाशिक बाहेर राहणार्‍या नागरिकांची जागा व्यवहारात फसवणूक झाली असेल तर त्यांनी मुंबई नाका पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या