Friday, May 3, 2024
Homeनगरपिंप्री लोकईच्या शेतकर्‍याची नापिकीला कंटाळून आत्महत्या

पिंप्री लोकईच्या शेतकर्‍याची नापिकीला कंटाळून आत्महत्या

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील जिरायती भागातील पिंप्री लोकई गावातील शरद नानासाहेब गाडेकर (वय 42) यांनी

- Advertisement -

कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीने झालेल्या नापिकीला कंटाळून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

पावसावर अवलंबून असलेली शेती आणि सततचा दुष्काळ यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शरद यांनी खरिपात मका आणि सोयाबीनची पेरणी केली. पण यावर्षी वारंवार झालेल्या अतिवृष्टीने डोळ्यासमोर पीक वाया गेले. विकास सोसायटीचे कर्ज आणि नातेवाईक, मित्रांकडून घेतलेले उसने पैसे कसे परत करायचे या चिंतेने त्यांना ग्रासून टाकले.

दोन वर्षांपूर्वी थोरल्या मुलीचे लग्न केले आणि त्यासाठी काही जमीन विकून लोकांची देणी दिली. आता दुसरी मुलगी लग्नाच्या वयात आली असताना निसर्गाची अवकृपा आणि पुन्हा कर्जबाजारीपणा वाट्याला आल्याने ते नैराश्यात गेले. अवघी 60 गुंठे जमीन आणि त्यावर उदरनिर्वाह करणे म्हणजे अग्निपरीक्षाच होती.

एक लहान मुलगा, पत्नी इतरांच्या शेतात काम करून कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करीत असताना शरद यांनी मात्र आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी कोणताच मार्ग दिसत नसल्याने धीर सोडला. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. त्यांचे वडील पिंप्री लोकई गावचे कामगार पोलीस पाटील आहेत. शेतकरी आत्महत्यांमागे शेतीचे पाणी आणि शेतीमालाला हमी भाव न मिळणे ही मुख्य कारणे आहेत.

निळवंडे धरणाचे पाणी कधी येणार याचेही उत्तर शरद यांना कुणाकडूनच मिळाले नाही. अत्यंत कोरडवाहू जमीन असल्याने दरवर्षी त्यांची शेती तोट्यात जात होती. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने गरजा भागविण्यासाठी नातेवाईक, मित्रांकडून उसने पैसे घेऊन एक एक दिवस काढायचा आणि शेतीतून चांगला पाऊस पडला तर काही तरी आधार मिळेल या अपेक्षेने जगायचे. पण अतिवृष्टीने पीक हातातून गेले आणि नैराश्येतून शरद यांना आयुष्याचा शेवट करावा लागला. सरकारची मदत मिळेना, पीक विम्याची खात्री वाटेना अशा परिस्थितीत या शेतकर्‍याने टोकाचे पाऊल उचलले.

लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शरद गाडेकर यांच्या कुटुंबाला सरकार आणि सामाजिक संस्थांनी मदत केली नाही तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. शिवाय मुलांना शिक्षण अर्धवट सोडून मोलमजुरी करावी लागेल. राज्यातील शेतकर्‍यांनी करोना महामारीत कष्ट करून जनतेचे पोट भरले. आता त्यांच्याच पोटाचा प्रश्न निर्माण झाला असताना समाजातील जागरुक नागरिक आणि सेवाभावी संस्था अशा कुटुंबाना मदतीसाठी पुढे येतात का हे बघावे लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या