Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीमेत 18 लाख नागरिकांची तपासणी

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेत 18 लाख नागरिकांची तपासणी

नाशिक। प्रतिनिधी

करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी राज्य शासनाकडुन सुरू करण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदार ही मोहीम महापालिकेकडुन दोन टप्प्यात पुर्ण करण्यात आली आहे. यात 18 लाख 36 हजार 800 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

या दोन टप्प्यात तपासणीत शहरात 619 कोविड रुग्ण आढळून आले आहे. या मोहीमेत 19 लाखांच्या वर नागरिकाची तपासणीचे लक्ष ठेवण्यात आल्यानंतर हे काम 97 टक्के पुर्ण करण्यात आले आहे.

करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यत पोहचून आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने राज्यात गेल्या 15 सप्टेंबर ते 10 आक्टोंबर पर्यत राज्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात आली. काही तांत्रीक बाबीमुळे महापालिका क्षेत्रातील ही मोहीम 24 आक्टोंबरपर्यत दोन फेरीत पुर्ण करण्यात आली आहे.

या मोहीमेत प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करतांना ताप व शरिरातील ऑक्सीजनची पातळी नोंदविण्यात आली. करोनापासुन बचावासाठी त्या कुटुंबाला आरोग्य शिक्षण देण्यात आले. तसेच तपासणीतून करोना सदृश व्यक्ती शोधण्याबरोबर रक्तदाब, हद्ययविकार, मधुमेह, लठ्ठपणा, किडणीचे आजार असलेल्या व्यक्तींना शोधून त्यांना उपचार करण्यात आले.

या मोहीमेत दोन फेर्‍यात प्रत्येकी 630 व 494 पथकाकडुन 47 हजार 740 घरात जाऊन माहिती नोंदविण्यात आली. यात 18 लाख 36 हजार 800 नागरिकांची तपासणी करण्यात आली.

तसेच या दोन फेर्‍या 1834 करोना संशयितांची तपासणी केल्यानंतर यात 619 करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. अशाप्रकारे गेल्या 24 आक्टोंबर रोजी शहरात दोन फेर्‍यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम पुर्ण करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या