दोंडाईचा – Dondaicha – वि.प्र :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ. अनिल गोटे यांच्या आवाहनानुसार दि.10 नोव्हेंबर रोजी दोंडाईचा येथे
असंख्य कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे. कोणकोण प्रवेश करणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
सकाळी 10 वाजता व्यापारी भवनात हा कार्यक्रम होईल. दिवाळीचा सण तोंडावर असताना फटाक्यांची आतिषबाजी ऐवजी दोंडाईचा शहरात राजकीय फटाके वाजवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत दिले आहेत.
माजी आ. अनिल गोटे, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जोडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. एकंदरीत पुढच्या वर्षाअखेर होणार्या पालिका निवडणुकी साठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.
डॉ.देशमुखांचा प्रवेश मुंबईत
माजी राज्यमंत्री डॉ.हेमंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख यांचा पक्षप्रवेश पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात होणार आहे.
त्यामुळे उद्या राष्ट्रवादीत घरवापसी करणार्यांमध्ये माजी नगराध्यक्ष, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका राजकीय सामाजिक पदाधिकारी, युवा कार्यकर्ते यांचा समावेश राहणार असल्याचे बोलले जाते आहे.