नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे दिवाळी निमित्त दिव्यांग बांधवांनी बनविलेल्या दिवाळी उपयोगी आकाश कंदील, रंगीबिरंगी पणत्या, दिवाळी फराळ इत्यादी वस्तुंची विक्री जिल्हा परिषद नाशिकच्या आवारात सुरू करण्यात आली आहे.
दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या सामजिक संस्थांना समाज कल्याण विभागाने जिल्हा परिषदेच्या आवारात या वस्तुंच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. दिव्यांग बांधव हे दरवर्षी दिवाळी त्याचबरोबर इतर सणांनिमित्त विविध उपयोगी वस्तू तयार करुन सामजिक संस्थांच्या माध्यमातुन विक्रीस आणतात. यावर्षी करोना संकटामुळे दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या या वस्तू नेमक्या विकायच्या कुठे असा प्रश्न दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या संस्थांना पडला होता.
त्यांनी याबाबतची कैफियत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड व समाज कल्याण अधिकारी रविंद्र परदेशी यांच्यासमोर मांडली. त्यावर बनसोड यांनी लगेचच जिल्हा परिषदेच्या आवारात या दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या संस्थांना जिल्हा परिषदेच्या आवारात दिव्यांग कल्याण कक्षासमोरच जागा उपलब्ध करुन दिली.त्यामुळे या सामाजिक संस्थांनी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानत त्यांच्याच हस्ते या वस्तुंच्या विक्रीचे स्टॉलचे उद्घाटन केले.
यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी रविंद्र परदेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे आदी उपस्थित होते.