Thursday, May 2, 2024
Homeनगरफळबाग उत्पादकांना 2 कोटी 22 लाखांचा पीकविमा मंजूर

फळबाग उत्पादकांना 2 कोटी 22 लाखांचा पीकविमा मंजूर

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सन 2019-2020 या आर्थिक वर्षात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त 450 शेतकर्‍यांना 2 कोटी 22 लाख रुपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisement -

या फळबाग उत्पादक शेतकर्‍यांना हा पीकविमा मिळाला पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. निलेश लंके यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे व कंपनी प्रशासनाशी वेळोवेळी संपर्क साधून व पाठपुरावा करून ही मदत या शेतकर्‍यांना मिळवून दिली आहे.

पारनेर तालुक्यातील डाळिंब उत्पादक 423 शेतकर्‍यांना 2 कोटी 20 लाख 3 हजार 940 रुपये तर 22 संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना 1 लाख 99 हजार 45 रुपये व 5 आंबा उत्पादक शेतकर्‍यांना 80 हजार 45 रुपये हवामानावर आधारित पीकविमा मंजूर करण्यात आला आहे.

पारनेरच्या शेकडो फळबाग उत्पादक शेतकर्‍यांनी ग्रीनकल्चर विमा कंपनीच्या माध्यमातून हवामानावर आधारित हा फळबाग पीकविमा उतरविला होता. अतिवृष्टीमुळे व हवामान बदलामुळे डाळिंब उत्पादक, आंबा उत्पादक व संत्रा उत्पादक या शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

शेती मालाला भाव न मिळाल्याने फळबाग उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. डाळिंब, आंबा व संत्रा हवामान आधारित 2019-20 ची पीक विमा रक्कम 2 कोटी 22 लक्ष 83 हजार 934 रुपये मंजूर झाली आहे. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकर्‍यांना आ. निलेश लंके यांनी दिलासा दिला आहे. पारनेर तालुक्यातील पळशी मंडलमधील 5 हजार 760 शेतकर्‍यांना 1 कोटी 53 लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून मंजूर झालेले आहे.

खरीप हंगामातील कांदा, सोयाबीन, बाजरी, मका, वाटाणा यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मंडलातील अतिवृष्टीग्रस्त गावांना ही मदत जाहीर केली असल्याचे आ. निलेश लंके यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या