Friday, May 3, 2024
Homeनगरखरेदी जोरात, करोना कोमात

खरेदी जोरात, करोना कोमात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दु:ख, दैन्याचा नाश करत मनामनांत सुख, शांती, समृद्धीचा दीप उजळणारा प्रकाशपर्व अर्थात दीपावलीला काल धनत्रयोदशीच्या दिवशी उत्साहात प्रारंभ झाला.

- Advertisement -

इतर सणांप्रमाणे या सणावरही करोनाची काळी छाया असली, तरी आशेची मंद का होईना एक पणती प्रत्येकाच्या मनात तेवत असल्याने अनेक नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. ग्राहकांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील नगर, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, कोपरगाव, राहाता, अकोले, नेवासा शहरांसह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा विविध साहित्यांनी सजल्या आहेत

प्रकाशपर्व दीपावलीनिमित्त कपडे, मिठाई, रांगोळी, पूजेचे साहित्य, सोन्याचे दागिने, आकाश कंदील, फटाके, सजावटीचे साहित्य, रोषणाईचे इलेक्ट्रिक दिवे, फळे, घरगुती वापराच्या वस्तू, अशा एक ना अनेक साहित्याची खरेदी केली जाते.

यंदा करोनामुळे बाजार थंडावलाच होता. त्यामुळे दिवाळीतही ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल की नाही याबद्दल व्यापारीही साशंक होते. पण, मागील काही दिवसांत ग्राहक दुकानांच्या पायर्‍या चढू लागले असून करोनामुळे मरगळलेल्या बाजारपेठेत आशेची धुगधुगी निर्माण झाली आहे.

नागरिकांचा सर्वाधिक भर कापड, मिठाई, घरगुती साहित्याच्या खरेदीवर दिसून येत आहे. दीपावली हे शुभपर्व असल्याने या शुभंकर सणानिमित्त घरी एखादी वस्तू घेणे शुभ मानले जाते. त्यामुळे विविध प्रकारच्या वाहनांची खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याशिवाय टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, मिक्सर ग्राइंडर, या वस्तूचीही खरेदी होत आहे. कापड व मिठाईच्या दुकानांत ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. धनत्रयोदशी निमित्ताने सोन्या-चांदीची दुकाने ग्राहकांनी फुलून गेली होती.

गर्दीमुळे वाढला धोका…

दिवाळीच्या सणानिमित्त कापड खरेदी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बाजारातील कापड दुकानांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. काही दुकानांमध्ये सॅनिटायझरची सुविधा नाही. ग्राहक शारीरिक अंतराचे पालन करत नाहीत. अनेकजण मास्क वापरत नाहीत. यासह किरणा माल, बस्ती जागांवर भरणारे विविधि साहित्य विक्रीचे बाजार या ठिकाणी होणार्‍या गर्दीमुळे करोनाचा धोका वाढला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या