Monday, May 6, 2024
Homeनगरअंगावर गरम पाणी पडल्याने ‘ज्ञानेश्वर’चे तिघे कामगार भाजले

अंगावर गरम पाणी पडल्याने ‘ज्ञानेश्वर’चे तिघे कामगार भाजले

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागात

- Advertisement -

काम करीत असताना गरम पाणी अंगावर पडून तिघे कामगार भाजल्याची घटना घडली. यातील एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागात काम करीत असताना गुरुवार दि.12 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:20 वाजता कँडेनसेट हॉट वॉटर टाकीतील गरम पाणी अंगावर पडून 3 कामगार भाजले होते.

त्यातील अशोक भीमा गायकवाड (वय 41) याला जास्त भाजल्याने त्याला त्याच दिवशी नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवार दि.15 नोव्हेंबर रोजी रात्री त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवार दि.17 रोजी सांयकाळी 5:40 वाजेच्या सुमारास त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने उपचारा दरम्यान रुग्णालयातच मृत्यू झाला.

घाटी रुग्णालयात शविच्छेदना नंतर बुधवार दि.18 रोजी दुपारी 2 वाजता भेंडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, कारखाना कामगार, मित्रमंडळी उपस्थित होते. त्याचे मागे आई-वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने कार्यकारी संचालक यांनी श्रद्धांजली अर्पण करून मयत कामगाराच्या कुटुंबियांना व्यवस्थापन यथोचित मदत व सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

भाजलेल्या संदीप फलके व दिलीप घालमोडे या दोन कामगारांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नेवासाफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या