Friday, May 3, 2024
HomeUncategorizedकहाणी एका अफलातून झंझावाताची....

कहाणी एका अफलातून झंझावाताची….

– अमोल पवार, कॅलिफोर्निया

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील दुसरे स्थान मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना गमवावे लागले असून, आता या स्थानावर एलन मस्क आले आहेत. मस्क यांची ही भरारी त्यांच्या सतत काही तरी अफलातून करण्याच्या मनोवृत्तीचे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठीच्या झपाटलेपणाचे फलित आहे.

- Advertisement -

अपयशातून शिकण्याचा स्वभाव आणि सतत नवीन काहीतरी करण्याची धडपड ही मस्क यांची बलस्थाने आहेत. ‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’ या कंपन्यांचे सर्वेसर्वा असणार्‍या एलन मस्क यांनीच हायपरलूप वाहतूक तंत्रज्ञानाची 2013 मध्ये जगाला प्रथम ओळख करुन दिली. त्यांना या शतकातील सर्वांत क्रांतिकारी व्यक्ती मानले जाते.

नजीकच्या भविष्यात श्रीमंत व्यक्ती वीकेन्ड साजरा करायला अंतराळात जातील, अशा वळणावर जग आले आहे. अंतरिक्षात रॉकेट, उपग्रह पाठविण्याचे काम आतापर्यंत जगभरातील सरकारी संशोधन संस्थांचे मानले जात होते. परंतु आज खासगी कंपन्याही या क्षेत्रात उतरल्यामुळे अंतरिक्ष हे पर्यटनकेंद्र होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे आणि या सर्व कंपन्यांमध्ये आघाडीवर आहे ती ‘स्पेस एक्स’ कंपनी. अ‍ॅलन मस्क हे या कंपनीचे संस्थापक. व्यवसायाच्या क्षेत्रात जगावेगळा विचार केल्यामुळे आणि त्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यामुळे आज ते जगातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना श्रीमंतांच्या यादीतील दुसरे स्थान दुसर्‍यांदा गमवावे लागले असून, यावेळी त्यांची जागा घेणारे आहेत अ‍ॅलन मस्क. 49 वर्षीय अ‍ॅलन मस्क यांची एकूण संपत्ती 7.2 अब्ज डॉलरनी वाढून 127.9 अब्ज डॉलर झाली आहे. त्यांची सर्वांत यशस्वी कंपनी असणार्‍या ‘टेस्ला’चे शेअर वधारल्यामुळे मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. या वर्षभरात मस्क यांच्या संपत्तीत एकंदर झालेली वाढ 110.3 अब्ज डॉलर एवढी आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार, जानेवारी महिन्यात श्रीमंतांच्या यादीत ते 35 व्या स्थानावर होते. परंतु आता ते थेट दुसर्‍या क्रमांकावर पोहोचले आहेत. 183 अब्ज डॉलर संपत्ती असणारे जेफ बेजोस हे या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. अ‍ॅलन मस्क दुसर्‍या स्थानी आल्यामुळे बिल गेट्स तिसर्‍या स्थानावर गेले आहेत.

जीवनात वेगळा विचार करणारा माणूस कसा आणि किती यशस्वी होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे अ‍ॅलन मस्क. कमी खर्चिक रॉकेट बनविण्याचे त्यांचे स्वप्न असून, हे रॉकेट एकापेक्षा अधिक वेळा वापरता आले पाहिजे, या दिशेने ते प्रयत्न करणार आहेत. यावरूनच त्यांच्या विचारांची दिशा किती वेगळी आहे हे दिसून येते. स्पेस एक्स, टेस्ला मोटर्स, पे-पाल अशा कंपन्या चालविणारे मस्क हे जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतसुद्धा समाविष्ट आहेत. जीवनात अनेक चढउतार पाहूनसुद्धा कधीच हार न मानल्याने ते इथपर्यंत पोहोचले. त्यांना या शतकातील सर्वांत क्रांतिकारी व्यक्ती मानले जाते. दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया शहरात मस्क यांचा जन्म 28 जून 1971 रोजी झाला. त्यांचे वडील अ‍ॅरोल मस्क हे इंजिनिअर होते तर आई मॉडेल होती. अ‍ॅलन मस्क लहान असतानाच त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. अ‍ॅलन त्यांच्या वडिलांबरोबर राहिले. कम्प्युटर आणि इंजिनिअरिंग या विषयावरील पुस्तके वाचण्याचा त्यांना लहानपणापासून छंद होता. स्वभावाने ते लाजाळू होते आणि कुणाशी फारसे बोलत नसत. वडिलांनी दिलेल्या कम्प्युटरवर ते प्रोग्रामिंग शिकू लागले. अवघे 12 वर्षांचे असताना मस्क यांनी केवळ पुस्तकांत माहिती वाचून ‘ब्लास्टर’ नावाचा गेम तयार केला. एवढेच नव्हे तर युक्तीने तो एका कंपनीला 500 डॉलरला विकला.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अ‍ॅलन मस्क कॅनडाला त्यांच्या आईकडे गेले. तिथे त्यांनी छोट्या-मोठ्या नोकर्‍या केल्या आणि आपल्या शिक्षणाचा खर्च चालविला. पेन्सिल्वेनिया विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रातील पदवीही संपादन केली. परंतु त्यांची ज्ञानाची भूक संपलेली नव्हती. त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला आणि भौतिकशास्त्रात पीएच. डी. चा अभ्यास सुरू केला. अमेरिकेत त्या काळात कम्प्युटर आणि इंटरनेटच्या क्षेत्रात बरेच काम सुरू होते. त्यांना त्यात व्यवसायसंधी दिसली. पीएच. डी. चा अभ्यास सोडून त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आणि त्यांचे बंधू किम्बे मस्क यांच्या साथीने ऑनलाइन काम करणारी ‘जिप-2’ नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. ही कंपनी 302 दशलक्ष डॉलरला विकून त्यांनी त्यात 22 दशलक्ष डॉलरची हिस्सेदारी मिळवली. मिळालेल्या पैशांमधून एक्स डॉट कॉम नावाची दुसरी कंपनी सुरू केली. तिचेच आजचे नाव पे-पाल असे आहे. ही कंपनी पाहता-पाहता बरीच लोकप्रिय आणि यशस्वी झाली. ऑनलाइन मनी ट्रान्सफरमध्ये मस्क यांनी क्रांती केली. ई-बे नावाच्या कंपनीने पे-पाल 1.5 अब्ज डॉलरमध्ये विकत घेण्याची ऑफर त्यांना दिली. ती स्वीकारल्यामुळे अ‍ॅलन मस्क यांना 165 दशलक्ष डॉलर मिळाले.

या पैशांमधूनच त्यांनी ‘स्पेस एक्स’ या कंपनीची स्थापना केली. मंगळावर मानवी वस्ती निर्माण करणे हे या कंपनीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यासाठी त्यांनी पुस्तके वाचून ज्ञान संपादन केले. या कंपनीसाठी त्यांना आणखी पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण करण्याचा विचार सुरू केला. रॉकेटद्वारे उपग्रहांचे प्रक्षेपण करणे खर्चिक होते. रॉकेट खरेदी करण्यासाठी मस्क रशियातसुद्धा गेले; पण रॉकेट खूपच महाग होते. याच काळात मस्क यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वांत धाडसी निर्णय घेतला. आपल्याच कंपनीत रॉकेट तयार करण्याचे त्यांनी ठरविले. पुन्हा वाचन वाढवून रॉकेटसंबंधी माहिती घेतली. स्वतः तंत्रज्ञान विकसित करून त्यांनी ‘फाल्कन’ रॉकेट तयार केले. परंतु दुर्दैवाने हे रॉकेट उड्डाणानंतर ‘क्रॅश’ झाले. परंतु मस्क यांचा पिंडच अपयशातून शिकण्याचा असल्यामुळे ते खचले नाहीत. दुसर्‍या रॉकेटचे प्रक्षेपणही अयशस्वी ठरले. नंतर त्यांनी तिसरे रॉकेट सोडले; पण उपयोग झाला नाही. इतक्या वेळा रॉकेट सोडण्याचा खर्च बराच मोठा झाला होता. मस्क कंगाल होण्याच्या स्थितीला आले होते. जगभरात त्यांची चेष्टा केली जात होती. तंत्रज्ञानाची माहिती नसलेला माणूस रॉकेट बनवतो आहे, अशी टर उडवली जात होती. अनेकांनी त्यांना ‘वेडा’ घोषित करून टाकले. परंतु मस्क यांनी तरीही प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर रॉकेटचे पुढील उड्डाण यशस्वी झालेच. नासाची अनेक उपकरणे आज स्पेस-एक्सच्या रॉकेटमधून अत्यंत कमी दरात आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर पोहोचविली जातात. मुख्य म्हणजे, आपल्या इच्छेप्रमाणे त्यांनी पुनर्वापर करता येईल असे रॉकेटही बनविले.

2004 मध्ये मस्क यांनी टेस्ला मोटर्समध्ये गुंतवणूक केली. या कंपनीत त्यांनी विजेवर धावणार्‍या मोटारी तयार करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना यश मिळाले आणि ते टेस्लाचे सीईओही बनले. एलन मस्क यांनीच हायपरलूप वाहतूक तंत्रज्ञानाची 2013 मध्ये जगाला प्रथम ओळख करुन दिली.सौरऊर्जेवर काम करणारी सोलर सिटी नावाची कंपनीही त्यांनी उभारली. 2016 मध्ये त्यांना फोर्ब्ज नियतकालिकात जगातील 100 सर्वांत प्रभावी व्यक्तींच्या यादीत स्थान देण्यात आले.

त्यांच्या मते, ज्ञान हेच सर्वांत महत्त्वाचे असते. त्यामुळेच ते सतत वाचन करीत असतात. आयुष्यात आलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने करून घेतले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नेहमी भविष्यकाळातील गरज ओळखून काम केले. एकाच क्षेत्रात काम न करता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ठसा उमटविला. भविष्यात पर्यावरणपूरक उद्योगांना किती महत्त्व येणार आहे, हे अ‍ॅलन मस्क यांच्या टेस्ला इलेक्ट्रिक मोटार आणि सौर ऊर्जेवरील प्रकल्पावरून दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे मस्क यांना अपयश आल्यामुळे ते कधीच थकले नाहीत. आज एवढे यश मिळवूनसुद्धा त्यांच्यात साचलेपण आलेले नाही. ते वाचन, विचार, अभ्यास आणि कृती कायम करतच राहतात. मधुचंद्राला गेले असतानाच त्यांना कंपनीतून काढून टाकल्याचा निरोप मिळाला होता. परंतु एवढा मोठा धक्का बसूनही त्यांनी हिंमत सोडली नाही. ‘गाइड टू द गॅलेक्सी’ हे लहानपणी वाचलेले पुस्तक त्यांना आठवले. अंतरिक्षाची दुनिया त्यांना खुणावत होती. त्यावेळी सुरू केलेल्या आणि आतापर्यंत सुरूच असलेल्या प्रयत्नांचे फळ म्हणजे ‘स्पेस एक्स’ या खासगी अंतरिक्ष कंपनीचे यश. कंपनीच्या स्थापनेनंतर चारच वर्षांत त्यांना नासाची उपकरणे अंतरिक्ष स्थानकापर्यंत पोहोचविण्याचे काम मिळाले. काहीतरी वेगळे करून दाखविण्याची त्यांची जिद्द कधीच कमी झाली नाही. म्हणूनच त्यांना प्रत्येक कामात यश मिळत गेले. अपयशातूनही ते शिकत गेले आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते झपाट्याने वर सरकत गेले आणि आज दुसर्‍या स्थानी आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या