Friday, May 3, 2024
Homeनाशिकद्राक्ष मशागतीला मजूर टंचाईचे ग्रहण

द्राक्ष मशागतीला मजूर टंचाईचे ग्रहण

पालखेड मिरचिचे। Palkhed Mirchiche (वार्ताहर)

निफाड तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात शिरवाडे, वडनेर, गोरठाण, वावी, नांदूर, सावरगाव, आहेरगाव, पाचोरे वणी आदी गावांच्या परिसरात यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पिकांवर दव पडत नसल्यामुळे द्राक्षबागांची नैसर्गिक मणी गळ होत नसून द्राक्ष बागांच्या घडविरळणीचे काम मजुरांना मोठ्या प्रमाणावर मिळत असल्यामुळे परिसरात कोकण पटट्टयातून असंख्य मजूर आलेले असताना सुद्धा मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासत आहे.

- Advertisement -

दरवर्षाच्या तुलनेत यावर्षी तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे राहिले असून हिवाळ्याचे दोन महिने संपून गेले असताना सुद्धा थंडीचा लवलेश नाही. मागील वर्षी जास्त पाऊस झालेला असतांना द्राक्षबागांमध्ये सतत पाणी साचल्यामुळे द्राक्षबागांची 70 टक्के प्रमाणात मणीगळ व घडांची कुज झाल्यामुळे अतोनात नुकसान झाले होते.

परंतु यावर्षी द्राक्ष पिकांवर रात्रीच्या वेळी दव पडत नसल्यामुळे द्राक्षबागांची नैसर्गिक मणी गळ होणे हे सोनाका जातीच्या द्राक्षाच्या पिकाला मणी लांबीसाठी अतिआवश्यक असते. तसेच इतर जातीच्या द्राक्षांना सुद्धा नैसर्गिक मणीगळ झाल्यास घडांची साईज योग्य प्रमाणात होते.

यावर्षी द्राक्ष मण्यांची गळ करण्यासाठी द्राक्षबागा फुलोरा अवस्थेत असल्यापासून युरिया, सल्फर, कॅराथेन, कॅल्शियम क्लोराईड, बोरोमीन, बोरॅक्स ही औषधे फवारुनही मणीगळ होत नसल्याने शेतकर्‍यांना आता घड विरळणीसाठी मजुरांची शोधमोहीम राबवावी लागत आहे.

तसेच परिसरात मका, सोयाबीन काढणे, टोमॅटो खुडणे, कांदे लागवड, तणनाशक फवारणी आदी कामे सुरू असून यावर्षी मजूरांचे दर वाढूनही मजूर मिळेनासे झाले आहे.

द्राक्षबागेसाठी मजुरांची दररोजच आवश्यकता भासते. औषध फवारणी, डिपिंग, थिनिंग आदी कामे नियमित पार पाडावी लागतात. तसेच थंडी वाढल्यास बागेत शेकोटी पेटवून उष्णता तयार करावी लागते.

द्राक्षमशागतीचा हंगाम सुरू झाल्यापासून ते द्राक्ष खुडणी पर्यंत द्राक्षबागेसाठी मजूरांची आवश्यकता भासते. यावर्षी डिपिंग साठी स्वतंत्र यंत्र आले असले तरी चार डिपिंगा व्यतिरिक्त इतर बागांच्या असंख्य मशागतीसाठी मजूर वर्गाची आवश्यकता भासते.

त्यामुळे सध्या तालुक्यात पेठ, सुरगाणा, गुजरात मधून मजूर मोठ्या प्रमाणात डेरेदाखल झाले आहेत. मजूरांवर वाढता खर्च त्यातुलनेत मिळणारे उत्पन्न याची सांगड घालण्याची कसरत शेतकर्‍याला करावी लागते. याव्यतिरिक्त व्यापारी पलायन ही नित्याची डोकेदुखी.

मागील वर्षी करोनामुळे व्यापारी निघून गेल्याने निर्यातक्षम द्राक्षाचे घेतलेले पीक शेतकर्‍यांना मातीमोल भावाने विकावे लागले. त्यामुळे आता यावर्षीच्या हंगामावरच शेतकर्‍यांची मदार असून शेतकरी द्राक्षमशागतीच्या कामात व्यस्त झाल्याचे दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या