Friday, May 3, 2024
Homeनगरआ. लंकेच्या आवाहनाला अ‍ॅड. शेळके साथ देतील का ?

आ. लंकेच्या आवाहनाला अ‍ॅड. शेळके साथ देतील का ?

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायत निवडणुका 15 जानेवारीला होणार आहेत. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा.

- Advertisement -

शासनाचा खर्च वाचवा व गावात एकात्मता व शांतता ठेवा व गावासाठी 25 लाखांचा निधी मिळवा असे आवाहन पारनेरचे आ. निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील नागरिकांना व गावपुढार्‍यांना केले आहे. पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन या गावामध्ये राष्ट्रवादीचे नेते व महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके आ. लंकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पिंपरी जलसेन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार का ? हे पाहणे पारनेरकरांसाठी औत्सुक्याचे झाले आहे.

गावपातळीवरच्या निवडणुका म्हटल्या दोन गट तयार होतात, गटबाजीनंतर हाणामार्‍या होतात, भावकी भावकित वाद होऊन शत्रूत्व तयर होते व त्याचा परिणाम गावच्या विकास कामांवर होतो. हे सर्व टाळण्यासाठी व गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पारनेर तालुक्याचा कुटुंब प्रमुख या नात्याने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी मी स्वतः प्रत्येक गावातील सर्वपक्षीय प्रमुख पुढार्‍यांशी बोलून समेट घडवून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

तालुक्यातील बिनविरोध निवडणूक करणार्‍या गावांसाठी 25 लाखांचा निधी देणार असल्याचे देखील आ. लंके यांनी जाहीर केले आहे. पिंपरी जलसेन हे गाव पारनेर तालुक्याच्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे समजले जाणारे गाव. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते स्व. सॉलिसिटर गुलाबराव शेळके व महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके यांचे गाव. या गावामध्ये विविध विकासकामांबाबत व निवडणुकांमध्ये उदय शेळके यांचा शब्द अंतिम मानला जातो.

गेल्यावर्षी याच गावाने उदय शेळके व त्यांच्या पत्नी गीताताई शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी फाउंडेशन स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे पिंपरी जलसेन गावच्या बिनविरोध निवडणुकीसाठी आ. लंकेच्या आवाहनाला अ‍ॅड. शेळके साथ देणार का ? पिंपरी जलसेन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणार का ? अशी चर्चा पारनेर तालुक्यातून होऊ लागली आहे. अ‍ॅड.शेळकेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या