Friday, May 3, 2024
Homeनाशिककिसान संघर्ष यात्रेचे स्वागत करणार

किसान संघर्ष यात्रेचे स्वागत करणार

मालेगाव । Malegaon (प्रतिनिधी)

केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी विरोधी काळे कायदे त्वरित रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकर्‍यांतर्फे सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन व पाठबळ देण्यासाठी नाशिक येथून दिल्ली येथे जात असलेल्या किसान संघर्ष संवाद यात्रेचे मालेगावी सर्वपक्षीयां तर्फे भव्य स्वागत करण्यात येऊन शहरातून प्रचंड मोर्चा काढत सभा घेऊन या यात्रेला समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

अन्नदाता असलेल्या शेतकर्‍यांच्या हितासाठी या किसान संघर्ष यात्रेचे शहरात फुलांचा वर्षाव करत शहरवासियांनी स्वागत करावे, असे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांतर्फे करण्यात आले आहे.

येथील उर्दु मीडिया सेंटरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत किसान संघर्ष संवाद यात्रेचे मंगळवार दि. 22 डिसेंबररोजी सकाळी भव्य स्वागत केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

टेहरे चौफुली येथून संघर्ष संवाद यात्रा शहरात प्रवेश करणार असून महात्मा गांधी पुतळ्याजवळ या यात्रेचे भव्य स्वागत केले जाईल. संगमेश्वरमार्गे शहरातून फिरल्यानंतर किदवाईरोडवर दुपारी 12 वाजता यात्रा पोहचल्यावर तिचे रूपांतर विराट जाहीर सभेत होणार आहे.

संविधान व लोकशाहीवर विश्वास आहे अशा नागरिकांनी न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांचा आवाज बुलंद करण्यासाठी संघर्ष संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. उद्योगपतींच्या लाभासाठी शेतकर्‍यांच्या हिताचा बळी देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.

त्यामुळे शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द व्हावेत या मागणीसाठी ही संघर्ष यात्रा आहे. या यात्रेचे शहरात ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करत स्वागत करीत अन्नदात्या शेतकर्‍याबद्दल मालेगाववासियांनी कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र भोसले यांनी केले.

शेतकरी संघटनांनी मागणी केली नसतांना केंद्र सरकारने लागू केलेले तीन काळे कायदे शेतकरी विरोधी आहेत. यामुळे शेतमालाचा संपुर्ण व्यापार कार्पोरेट कंपन्यांच्या हातात जाणार आहे. अंबानी, अदाणीच्या हितासाठी हे सरकार काम करीत असल्याने शेतकरी चिडून रस्त्यावर आंदोलन करीत आहे.

त्यामुळे या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी जात असलेल्या किसान संघर्ष यात्रेचे मालेगावकरांनी उत्स्फुर्त स्वागत करत शेतकरी आंदोलनाचे समर्थन करावे, असे आवाहन काँग्रेसचे माजी आ. शेख रशीद यांनी यावेळी बोलतांना केले.

केंद्र सरकारने संमत केलेले तीन कायदे शेतकरी विरोधी असल्याने ते रद्द करावेत या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास शिवसेनेचा पाठिंबा आहे. मंगळवारी येणार्‍या किसान संघर्ष यात्रेचे शिवसेनेतर्फे स्वागत केले जावून सहभाग नोंदविला जाईल, अशी माहिती उपमहापौर निलेश आहेर, उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला यांनी यावेळी बोलतांना दिली.

यावेळीे काँग्रेसनेते प्रसाद हिरे, राष्ट्रवादीचे अतीक अहमद कमाल अहमद, बसपचे रमेश निकम, कॉ. शफिक अहमद आदींनी मार्गदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या