Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकबारावी परीक्षेच्या अर्जांसाठी मुदतवाढ

बारावी परीक्षेच्या अर्जांसाठी मुदतवाढ

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेत नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेस वरून नियमित शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने भरण्यास १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

- Advertisement -

या परीक्षेसाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आवेदनपत्रे ऑनलाइन भरायची आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे नियमित शुल्कासह सरल डेटाबेसवरून येत्या १८ जानेवारीपर्यंत ऑनलाइन भरता येणार आहे.

तर बारावीच्या परीक्षेसाठी व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे अशा विद्यार्थ्यांनाही या कालावधीपर्यंत परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

नियमित आवेदनपत्र भरण्याच्या या मुदतवाढीनंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरायच्या कालावधीत उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमीट केल्यानंतर त्यांना कॉलेज लॉगिनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करून दिलेली जनरल रजिस्टरच्या माहितीनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. प्री-लिस्टवर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी आणि त्यानंतर ही प्री-लिस्ट चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावे.

महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री-लिस्ट 28 जानेवारीपर्यंत जमा करायची आहे. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) “ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट’ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना याच कालावधीत संबंधित प्रशिक्षण संस्थेद्वारे ऑनलाइन आवेदनपत्र भरणे आवश्‍यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या