Sunday, May 5, 2024
Homeनगरराहुरीत ढगाळ हवामान आणि अवकाळीने रब्बी अडचणीत

राहुरीत ढगाळ हवामान आणि अवकाळीने रब्बी अडचणीत

राहुरी (प्रतिनिधी)-

गेल्या दोन दिवसांपासून राहुरी तालुक्यात ढगाळ हवामानामुळे शेतकर्‍यांसह आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत.

- Advertisement -

बुधवारी गुहा, देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी या भागात अवकाळी पावसाचा शिडकावा पडल्याने रब्बी हंगामातील पिके गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगाचा प्रादूर्भाव झाला असून त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भिती व्यक्त होत आहे.

दरम्यान बुधवारी संध्याकाळी राहुरीसह आजूबाजूच्या काही परिसरामध्ये पावसाच्या सरी बरसल्या. रब्बी पिकांची परिस्थिती दिलासा देणारी असतानाच, ढगाळ वातावरणाने पिकांना फटका दिला आहे. तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या वातावरणामुळे काही ठिकाणी गहू, हरभरा या पिकांवर मावा, तर ज्वारीवर चिकटा पडला आहे.

अशीच परिस्थिती आठ – दहा दिवस कायम राहिल्यास रब्बी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे . ऑक्टोबर महिन्यात शेतकर्‍यांना अनेकदा अतिवृष्टीला सामोरे जावे लागले. या अतिवृष्टीचा खरीप पिकांना दणका बसला . यंदा राहुरी तालुक्यात गहू आणि ज्वारीचे क्षेत्र घटले असले तरी उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा आहे. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना थंड हवामान पोषक असते. थंडीमुळे या पिकांच्या उत्पादनात वाढ होते. यंदाच्या थंडीने गहू, हरभरा ही पिके चांगली बहरली आहेत.

तर यंदा आंब्यालाही चांगलाच मोहोर आला आहे. मात्र, ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे आंब्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्ष व आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या