Friday, May 3, 2024
HomeUncategorizedभारतात वसले चिनी गाव

भारतात वसले चिनी गाव

– सत्यजित दुर्वेकर

पाकिस्तान आणि चीन हे भारताचे सख्खे शेजारी असले तरी पक्के वैरी आहेत. ही बाब जगाला चांगलीच ठावूक आहे.पाकिस्तान दहशतवाद्यांच्या मार्गाने तर चीन घुसखोरीच्या माध्यमातून भारतात सतत कुरापत करत असतात.

- Advertisement -

गलवान खोर्‍यातील संघर्षामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणलेले असताना आता चीनने चक्क भारताच्या हद्दीत शंभर उंबर्‍याचे गाव वसविले आहे. ही बाब गंभीर असून वेळीच चीनच्या विस्तारवादी भूमिकेला आवर घालणे गरजेचे झाले आहे.

चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये गाव वसविले असेल तर ही बाब चिंताजनक आहे. माध्यमांतील वृत्तानुसार चीनने भारताच्या आत अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्यक्ष सीमे रेषेच्या साडेचार किलोमीटर आत 101 घरांची बांधणी केली आहे. हे गाव अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील त्सारी चू गावाच्याही आत असल्याचे सांगितले जात आहे. सॅटलाइट छायाचित्रातून नव्या गावाचा चेहरामोहरा समोर आला आहे. ताजे छायाचित्र नोव्हेंबर 2020 चे आहे. यात शंभर उंबर्‍याचे गाव स्पष्टपणे दिसते. विशेष म्हणजे एक वर्षापूर्वीच्या छायाचित्रात तेथील भाग मोकळा दिसतो. म्हणूनच चीनने या काळातच नवीन गाव वसवल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे गाव भारतासाठी धोकादायक आहे.

भारताच्या सीमेत शंभर घरे बांधली जातात आणि त्यांचा थांगपत्ता गुप्तचर यंत्रणांना लागत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमा संवेदनशील आहेत आणि तेथे आपली गुप्तचर यंत्रणा अधिक सजग असते. त्याचवेळी वेळोवेळी इशाराही दिला जातो. पण चीनचे लोक भारतात येऊन बांधकाम करत असताना आपल्या यंत्रणा काय करत होत्या, हे कोडे न उलगडण्यासारखे आहे. उपग्रहाच्या छायाचित्राचा आधार घेतच सीमेच्या आत चीनने गावाची निर्मिती केल्याचे सांगितले जात आहे. तज्ञ मंडळी देखील या चित्राचाच आधार घेऊन माहिती देत आहेत. हे जर चीनचे कारस्थान असेल तर भारत सरकारने यातील सत्य शोधायला हवे आणि त्याची भूमिका देशासमोर स्पष्ट करायला हवी. सीमेवर आपले जवान तैनात असताना चीनकडून भारतात बांधकाम करण्याची हिमंत कशी होते,हे देखील देशाला जाणून घ्यायचे आहे. शेजारच्या देशात घुसखोरी करण्याची चीनची सवय जुनीच आहे. या सवयीची सर्वांनाच जाण असल्याने चीनलगतचे देश सतत जागे असतात. तरीही हा ड्रॅगन कुरापती करतच राहतो. भूतानच्या सीमेवर डोकलाम येथे देखील अशाच प्रकारचे गाव भूतान सीमेच्या 2 किलोमीटर आत वसवले होते आणि तेथून अरुणाचल प्रदेशवर दावा केला.

अशा कुरापतींमुळे चीनवर विश्वास ठेवणे कठिणच आहे. चीनच्या या नव्या कृतीबाबत भाजपचे खासदार सुब्रह्यण्यम स्वामी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. तसेच या प्रकरणात सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. वास्तविक अप्पर सुबनसिरी जिल्हा हा भारत आणि चीन यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादाचा केंद्रबिंदू राहिला आहे. यावरून सशस्त्र संघर्ष देखील झाला आहे. दुसरीकडे पश्चिम सेक्टरमध्ये लडाख येथे भारत आणि चीनचे सैनिक समोरासमोर असताना अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने गावाची उभारणी करुन नवीन कुरापत केली आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सीमेवर भारताकडून होणार्‍या विकास कामाबद्धल चिंता व्यक्त केली होती. चीनने म्हटले की, काही काळापासून भारतीय सरकार पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सीमेवर कामे करत असून सैनिकांची नियुक्ती करत आहे आणि ही कृती वादाची आहे. त्याचवेळी उपग्रहांच्या छायाचित्रावरून स्पष्ट दिसते की, चिनी गावाजवळ भारताचा कोणताही मार्ग नाही आणि कोणतेही पायाभूत विकास कामे नाहीत. त्यामुळे चीनचा हा निव्वळ ढोंगीपणा आहे. दोन महिन्यापूर्वी अरुणाचल प्रदेशचे खासदार तापिर गावो यांनी म्हटले की, अरुणाचलच्या भागात चीनची घुसखोरी वाढत चालली आहे. यावेळी त्यांनी अप्पर सुबनसिरी जिल्ह्याचा उल्लेख केला होता.

गावो यांच्या मते, चीनचे बांधकाम अजूनही सुरूच आहे. आपण नदीमार्गाने पाहिल्यास चीन हा सुबनसिरी जिल्ह्याच्या सीमेत 60 ते 70 किलोमीटर आत आल्याचे दिसून येते. म्हणूनच खासदारांचे म्हणणे सरकारने गांर्भीयाने घ्यायला पाहिजे. चीनने नेपाळच्या दीडशे हेकटरवर ताबा मिळवला आहे. सीमेवर घुसखोरी करुन जागा बळकावणे ही चीनची खासियत आहे. समुद्रावर देखील बेकायदेशीरपणे मालकी जाहीर केली जाते. त्यामुळे भारताने या गोष्टी पाहून अरुणाचल प्रदेशमधून चीनला पिटाळून लावणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या