Sunday, May 19, 2024
HomeUncategorizedआजारांची ‘साथ’ आणि भारताची मात!

आजारांची ‘साथ’ आणि भारताची मात!

– डॉ. संजय गायकवाड

कोरोना संसर्गाने अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये हाहाकार माजविला आहे, त्या कोरोनामुळे भारताचे मात्र तुलनेने कमी नुकसान झाले.

- Advertisement -

एवढेच नव्हे तर प्रभावी लस तयार करण्यातही भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु असे पहिल्यांदाच घडत आहे, असे मात्र नाही. यापूर्वीही देशाने गोवर, प्लेग, अतिसार, कावीळ आदी साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविले आहे. आजारांना पराभूत करण्याच्या आघाडीवर भारताची कामगिरी आतापर्यंत शानदार राहिली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारताने योजलेल्या कठोर उपाययोजना अनावश्यक असल्याचे सुरुवातीला काही देशांनी म्हटले होते. मात्र, आता या देशांच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे. कारण हर्ड इम्युनिटी म्हणजेच समूह प्रतिकारशक्तीवरून असे दिसून येते की, प्रत्येक 10 व्यक्तींमागे एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. हा आकडा थोडा कमी केला, तरी अनुमान असे आहे की, भारतात सुमारे 6 ते 7 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. त्यामुळे उपचार घ्यावे लागलेल्या रुग्णांची संख्या 1 कोटीपेक्षा थोडी अधिक असली तरी प्रत्यक्षात संसर्गग्रस्तांची संख्या कितीतरी अधिक आहे. त्या तुलनेत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण अत्यल्पच म्हणावे लागेल.

संसर्गाचा सामना करण्याच्या बाबतीत भारत इतर देशांच्या तुलनेत खूपच आघाडीवर राहिला. त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे लस तयार करण्यात भारताला आलेले यश. आजमितीस डझनावारी असे देश आहेत, जे भारताकडून लस मिळेल यासाठी आशेने आपल्याकडे पाहत आहेत. वास्तविक आपल्या अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती पाहता, हे यश खूपच मोठे आहे. डब्लूएचओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनेही भारताच्या या यशस्वितेबद्दल तारीफ केली आहे. संघटनेचे संचालक डॉ. मायकेल रेयान यांच्या म्हणण्यानुसार, भारताने ज्या निग्रहाने विषाणूला परतविले आहे, त्यापासून संपूर्ण जगाने धडा घ्यायला हवा.

एखाद्या जागतिक संसर्गाशी यशस्वीपणे, दक्षतेने आणि झुंजारपणे लढा देण्याची भारताची ही काही पहिलीच वेळ आहे असे नाही. यापूर्वीही अनेक अक्राळविक्राळ आजारांना भारताने हद्दपार केले आहे. विशेषतः गोवर आणि पोलियो हे आजार भारताने हद्दपार केले. एके काळी भारतीय समाजासाठी हे दोन आजार म्हणजे एक मोठे आव्हान होते. गोवर या आजाराशी भारताने तीन दशके न थकता मुकाबला केला. 1947 मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा इंग्रजांपेक्षाही मोठी समस्या या देशात गोवरची होती. 1962 मध्ये राष्ट्रीय गोवर निर्मूलन कार्यक्रमास सुरुवात झाली. दुर्दैवाने त्याच वर्षी भारत आणि चीन यांच्यात युद्धाचा भडका उडाला. अन्यथा गोवर लसीकरणात भारताला त्याच वेळी यश आले असते. परंतु चीनसोबत युद्धात गुंतलेला असूनसुद्धा भारताने लसीकरणाचा कार्यक्रम बंद केला नाही. अर्थात, युद्धामुळे तो कार्यक्रम काहीसा क्षीण नक्कीच झाला. 1975 मध्ये म्हणजे सुमारे 13 वर्षांनंतर या मोहिमेला यश मिळाले. गोवरचा अंतिम रुग्णही त्या वर्षी बरा झाला. 1977 ला भारत गोवरमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले.

गोवरविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी भारताने जो निग्रह दाखविला, त्याचे जगात कौतुक झाले. परंतु विजयाचे याहूनही मोठे मुकूट भारताला अजून मिळायचेच होते. भारताने गोवरपाठोपाठ प्लेग निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला. एके काळी भारतात प्लेगने 44 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. भारताने प्लेगविरुद्धची झुंज 80 चे दशक सुरू होण्यापूर्वी केली. 1994 मध्ये आपण या आजाराविरुद्धची लढाई निर्णायकपणे जिंकली. सुमारे 35 हजार कोटी रुपये यासाठी खर्च करावे लागले. त्या पाठोपाठ अतिसाराशी झुंजण्याची वेळ आली. भारतात 1817 ते 1824या कालावधीत अतिसार सर्वप्रथम कोलकत्यात पसरला. काही दिवसांतच हजारो लोक मारले गेले. पुढील दशकात भारतात दहा लाख लोक अतिसाराने मारले गेले. 1960 च्या दशकात भारतात पुन्हा एकदा अतिसाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून आले. परंतु या आजाराविरुद्ध जेव्हा भारताने निर्मूलन मोहीम छेडली, तेव्हा 90 चे दशक सुरू होता-होता केवळ काही रुग्णच उरले. 2007 मध्ये ओडिशात अतिसाराचे अखेरचे काही रुग्ण ओडिशामध्ये दिसून आले. त्यानंतर अतिसाराने त्रस्त असलेला एकही रुग्ण भारतात आढळला नाही.

यानंतरची मोठी लढाई पोलिओविरुद्धची होती. पोलिओ हा एक असा आजार आहे, जो अनुवंशिकरीत्या पिढ्यान्पिढ्या पाठलाग करू शकतो. भारताने पोलिओविरुद्धही मोठी लढाई लढली आहे. सन 1977 मध्ये भारताने प्रथमच पोलिओचे पोटात घेण्याचे डोस बनविले आणि विविध राज्यांमध्ये पोलिओ मुक्तीचे अभियान सुरू केले. 1995 मध्ये हे अभियान एकाच वेळी संपूर्ण देशभरात राबविण्यात आले. त्यासाठी देशभरात 6 लाख 45 हजारपेक्षाही जास्त पोलिओ बूथ तयार करण्यात आले आणि या अभियानाच्या माध्यमातून सुमारे 25 लाख लोकांना एकत्र आणण्यात आले. कोणत्याही एका आजारासाठी एवढी मोठी लढाई त्यापूर्वी कधी झाली नव्हती. आपल्या पोलिओविरोधी मोहिमेचे जगभरातून जबरदस्त कौतुक झाले. सन 2014 मध्ये भारत निर्णायकरीत्या पोलिओमुक्त घोषित करण्यात आला.

गोवरप्रमाणेच मलेरिया हाही एक घातक संसर्गजन्य आजार आहे. या आजाराविरुद्धही आपण राष्ट्रीय स्तरावर युद्ध पुकारले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतात मलेरियामुळे दरवर्षी 2 लाख रुग्ण दगावत होते. तथापि गेल्या दहा वर्षांत मलेरियामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. त्यानंतर अऩेक संशोधनेही झाली असून, त्यातून असे स्पष्ट झाले आहे की, गोवर आणि पोलिओपाठोपाठ मलेरियाचीही या देशातून लवकरच हकालपट्टी होईल. कारण भारताने निर्णायक युद्धासाठी अनेक लशी विकसित केल्या आहेत. म्हणजेच, ज्याच्याविरुद्ध संपूर्ण देशाने एकसाथ खांद्याला खांदा लावून लढा दिला, असा कोरोना हा एकमेव आजार नव्हे. यापूर्वी अनेक आजारांशी लढाई लढून आपण विजयी ठरलो आहोत. किंबहुना आजारांशी लढून त्यांच्यावर विजय मिळविणे ही आपल्याला जडलेली एक सवयच आहे, असे म्हणावे लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या