Sunday, May 19, 2024
HomeUncategorizedमाझे कुटुंब - माझी जबाबदारी... कुठपर्यंत अन् कधीपर्यंत...?

माझे कुटुंब – माझी जबाबदारी… कुठपर्यंत अन् कधीपर्यंत…?

पुरुषोत्तम गड्डम

देशात आतापर्यंत साधारणपणे तीन कोटी लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला, सव्वाशे कोटी जनतेचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी लशीची उपलब्धता, आरोग्य यंत्रणा आणि जनतेची मानसिकता या बाबी विचारात घेता किमान 3-4 वर्षे लागतील…. तोपर्यंत ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ हा विचार अंमलात आला नाही तर पुन्हा लॉकडाऊनचे भूत बसणार!

- Advertisement -

हे कुठपर्यंत आणि कधीपर्यंत चालणार? या सतावणार्‍या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर सरकारी निर्देशानुसार धावत-पळत जाऊन कोविड लसीकरण करुन घेणे अन सामाजिक स्तरावर रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करणे हेच आपल्या हाती आहे….!

न हमसफर,

न किसी हम- नशी से निकलेगा ।

हमारे पाँव का काँटा है,

हमीं से निकलेगा।

मशहूर शायर राहत इंदौरी यांचा हा शायराना अंदाज भविष्यातील प्रत्येक कोविडवासी नागरिकाने लक्षात घेणे अनिवार्य झाले आहे. समाजात वावरतांना सामाजिक अंतर राखा, वारंवार हात धुवा, सॅनिटायझर वापरा, सर्दी-पडसे-खोकला… यासारखी लक्षणं आढळल्यास डॉक्टरांना भेटा, कोविड टेस्ट करुन घ्या, अणि हे सगळं केल्यानंतरही जेव्हा, गावागावात-शहरा-शहरात पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या वाढली की पुन्हा लॉकडाऊन आणि ‘माझे कुंटुृुंब-माझी जबाबदारी’ असे ऐकत ‘दारे बंद करुन स्वतःपुरते पहा’ हे धोरण कुठपर्यंत आणि कधीपर्यंत चालणार? या प्रश्नांवर प्रत्येक भारतीयाने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नोकरदार, मध्यमवर्गीय आणि सधन जमातीला फार काळ लॉकडाऊन सहन होईलही, पण ज्याचं पोट हातावर चालत त्याचं काय…? दहा बाय दहाच्या खोलीतील आठ-दहा जीवाचं कुटुंब पोसणार्‍या मोजक्या हातांनी या लॉकडाऊनमध्ये लटकायचं तरी कोठे? “कोरोना मतलब… कोई रोडपर ना निकले…!” असं सांगणाराच जात तरी काय, तो तर रोडवर निघतच नाही, तो विमानानं हवेतच फिरतोय… पण या सव्वाशे कोटीमधील कॉमन मॅनचं काय…? अशी सगळी हाताश आणि विपरित स्थिती आज निर्माण झाली असली तरी एक गोष्ट मात्र आशेचा किरण लेऊन आपणास कोरोनाच्या अंधःकारातून प्रकाशवाट दाखविणारी सिध्द झाली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे कोरोनावरील अधिकृत आणि सुरक्षित प्रतिबंधात्मक लस…! आता दुसर्‍या टप्प्यामध्ये 60 वर्षांवरील नागरिक आणि गंभीर व्याधी, मधुमेह, रक्तदाब… यासारख्या व्याधी असणार्‍या 45 वर्षांवरील नागरिकांना अधिकृत सरकारी आरोग्य केंद्रावर मोफत लसीकरण सुरु झाले आहे. त्यासाठी निर्देशीत प्रत्येक नागरिकाने स्वतःहून तात्काळ लसीकरण करुन घेतले पाहिजे. कारण आपल्या नशिबाच्या पायातील काटा, हा आपणच काढला पाहिजे, तो रुतला तर दुसरा-तिसरा सोडा.. आपल्या कुटुंबातलासुध्दा कोणी पुढे यायला तयार होत नाही.

लॉकडाऊन टाळायचा असेल तर…

माझी वयाची साठी उलटली नसली तरी 10 मार्च रोजी सरकारी आरोग्य केंद्रात जाऊन मी कोविशिल्ड कंपनीची लस टोचून घेतली. साठीच्या वर्गवारीत बसत नसलो तरी वयाची अठ्ठेचाळीस वर्षे मी पार केली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून पत्रकारितेत खाजवत असलेली धग म्हणा की शिक्षण क्षेत्रातील नोकरीची दगदग म्हणा किंवा अन्य काही कारणास्तव म्हणा… रक्तदाब नावाचा दाब आयुष्याला दाबू पाहात आहे. पण वैद्यकीय उपचार आणि व्यायाम व आहारशैलीचा आधार घेत मी माझ्यातल्या रक्तदाबाला सव्वाशेच्या वर काही उधळू देत नाही.. असो! सांगायचं तात्पर्य म्हणजे बी.पी. पेशंट असल्याने जागरुक नागरिक म्हणून कोरोना लस टोचून घेतली पण तेथे सहज चौकशी केली असता, अपेक्षित प्रमाणापेक्षा केवळ 7 टक्के लोकांनीच लस टोचून घेतल्याचे ध्यानात आले. म्हणजे ‘कोई रोड पे ना निकले’ याचा अर्थ या आमच्या बहाद्दरांनी येथे लावला! कोरोना मुक्तीसाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. त्यात भारतही आघाडीवर आहे. मात्र जर लॉकडाऊन नावाचं भूत कायमच मानगुटीवरुन हाकलायच असेल तर नागरिकांनी सरकारी निर्देशानुसार तातडीने लसीकरण करणे अनिवार्य आहे.

लसस्वी भवः… हाच पर्याय!

परवा पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात 2 कोटी 58 लाख 88 हजार 160 लोकांचे तर राज्यात 33 लाख 17 हजार 696 जणांचे प्रथम टप्प्यातील लसीकरण झाले. ‘ब्लूमबर्ग कोविड व्हॅक्सीन ट्रॅकर’ या जागतिक संस्थेच्या संरक्षणानुसार जगाच्या सध्याच्या लोकसंख्येपैकी 75 टक्के लोकसंख्येचे दोन वेळा (दोन डोस) लसीकरण करण्यासाठी किमान 6, 7 वर्षे लागणार आहेत. हा वेग लक्षात घेता, या विषाणूविरोधात जागतिक स्तरावर रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे जाऊ द्यावी लागतील. थोडक्यात जागतिक स्तरावर विचार केल्यास कोरोना नावाचं भूत आपल्या समवेत किमान 8-10 वर्षे तरी कमी अधिक प्रमाणात असणार आहे. त्यासाठी एवढ्या वर्षात वारंवार लॉकडाऊन आणि संचारबंदी परवडण्यासारखी नाहीच. त्याकरिता प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छता, वारंवार हात स्वच्छ करणे, मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे, आरोग्य विषयक काळजी घेणे हे सारे करणे बंधनकारक असले पाहिजे. मात्र भारतासारख्या महाकाय देशांमध्ये

बर्बाद गुलीस्ता करने को,

बस एक ही उल्लू काफी था।

हर शाख पे उल्लू बैठा है,

अंजाम-ए-गुलीस्ता क्या होगा ।

… अशी अवस्था असल्याने चिंतेचे ढग गडद झाले आहेत. कारण अजूनही आमच्या देशवासीयांना हात वारंवार स्वच्छ धुवा, हे सांगण्यासाठी जाहिरात कॅम्पेन करावे लागत आहे. मास्क वापरा… यासाठी कायद्याचा दंडुका उगारला जात आहे. आपल्यातील अशा ‘उल्लूंची’ संख्या वाढली असल्याने पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या आता नव्याने वाढू लागली आहे. त्यासाठी वेगाने कोविड लसीकरण मोहिम राबविणे हाच एक प्रभावी उपाय आहे. तथा प्रत्येकाने सरकारी निर्देशानुसार ‘लसस्वी भवंः’ हा मंत्र आचरणात आणणे गरजेचे आहे.

लॉकडाऊन… केवळ पॉझ बटन

10 फेबु्रवारी 2021 रोजी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या साधारण तीन हजारांवर होती आणि 10 मार्च 2021 रोजी केवळ महिन्याभराच्या कालावधीत हीच संख्या तेरा हजारांवर पोहोचली. या दोन महत्त्वाचे कारण आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रुग्णांची संख्या कमी झाली आणि माणसं सुसाट सुटली, त्याच वातावरणात मोठा बदल घडला. हे प्रमुख कारण दुसरे म्हणजे जानेवारीत किमान 14 हजार ग्रामपंचायतीचे झालेले इलेक्शन होय. यात गावात येणार्‍या-जाणार्‍यांची संख्या वाढली. शारीरिक अंतराचा सिध्दांत पाळला गेला नाही. लग्नाच्याही वराती निघाल्या. या प्रकारामुळे रुग्णसंख्या वाढली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याची चिन्हे दिसताच राज्य सरकार पुन्हा ‘लॉकडाऊन’ची भाषा वापरायला लागली आहे. पुन्हा लॉकडाऊन घडला तर कोरोना थांबेल पण तो कवेळ त्या लॉकडाऊन पुरताच थांबेल! लॉकडाऊन म्हणजे केवळ एक पॉझ बटन आहे. हे आताशा सर्वांच्याच लक्षात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय ठरु शकत नाही.

..कोविड विषाणू हा सहजासहजी तरी आपणातून हद्दपार होणार नसल्याने पराकोटीची काळजी घेणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असले पाहिजे. वारंवार हात धुवा, सॅनी टायझर वापरा, मास्क नियमानुसार लावा. गरजेपुरता प्रवास करा. गर्दीचे समारंभ टाळा, ‘फ्ल्यू’ सारख्या आजाराची लक्षणे असतील तर कोविड चाचणी करुन घ्या. कोविड रुग्णांनी नियम पाळत विलग रहा… आदि सगळ्या गोष्टींची माहिती आता प्रत्येक भारतीयाला जवळपास माहिती झाली आहे. पण केवळ बेफिकीर प्रवृत्तीमुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ पहात आहे. त्यासाठी आणखी एकच प्रभावी योजना सरकारने यासाठी राबविली पाहिजे आणि ती म्हणजे कोविड लसीकरण सर्वांसाठी खुले केले पाहिजे.

आता कोविड लसीकरण सर्वांसाठी खुले केले पाहिजे या विधानावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ शकतात. त्यात लसीची उपलब्धतता आणि आरोग्य यंत्रणेची क्षमता… या गोष्टी पुढे येतील. पण जर भारत इतर देशांना कोविड लस पुरविण्याच्या प्रयत्नात आहे हे आपण रोजच बातमींच्या माध्यमातून वाचतो आहे. हे करण्यापेक्षा आधी प्रत्येक भारतवासियांचे लसीकरण करुन घेतले पाहिजे. आपली आरोग्य यंत्रणा तशी सक्षम केली पाहिजे. घराघरापर्यंत पोहोचवून लसीकरण मोहिम राबविली पाहिजे. हा एकच प्रयत्न जर मनापासून आणि वेगाने केला तर हर्ड-इम्युनिटी वाढेल आणि विषाणूचा प्रभाव ओसलेल..! म्हणून सरकारने इतर देशांचा विचार न करता, प्रथम भारतीयांचा विचार केला पाहिजे आणि ‘मागेल त्याला लस’ यापेक्षाही ‘प्रत्येकाला लस’ हेच अभियान राबविले पाहजे…. जाता जाता शायर राहत इंदौरींचा आणखी एक शेर आपल्या पुढ्यात…

बीमार को मरज की,

दवा देनी चाहिए….!

जो पीना चाहता है,

पिला देनी चाहिए….!

- Advertisment -

ताज्या बातम्या