Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात लसीकरणाचा वेग वाढणार

राज्यात लसीकरणाचा वेग वाढणार

नवी दिल्ली । प्रतिनिधी

महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी दर आठवड्याला 20 लाख करोना लसीचे डोस उपलब्ध करावेत, ही राज्याची मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी मान्य केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -

टोपे यांनी येथे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन व केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची भेट घेतली व महाराष्ट्रातील करोनाची ताजी स्थिती व करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत राज्य सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची त्यांना माहिती दिली.

या भेटीबाबत माहिती देतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, दररोज 3 लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे राज्याचे लक्ष्य असून त्याकरिता आठवड्याला 20 लाख या गतीने लस उपलब्ध करावी, अशी विनंती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केली.

राज्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजार असलेले 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना लशीचे प्रत्येकी दोन डोस मिळून महाराष्ट्राला 2 कोटी 20 लाख डोस लागणार आहेत.

लसीकरणासाठी राज्यात आणखी 150 इस्पितळांना परवानगी देण्याची मागणीही टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री व आरोग्य सचिवांकडे केली. सध्या सरकारी व खाजगी इस्पितळे मिळून राज्यात 209 इस्पितळांना लसीकरणासाठी मान्यता मिळालेली आहे. तसेच, लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने सर्व सुविधा असलेल्या 50 खाटांच्या इस्पितळांना देखील लसीकरणासाठी मान्यता देण्यात यावी, अशी विनंती राज्यातर्फे करण्यात आल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या