Tuesday, May 7, 2024
Homeजळगावजिल्ह्यातील सहा तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका

जिल्ह्यातील सहा तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात दि. 20 मार्च रोजी अचानक झालेल्या वादळी वार्‍यासह गारपीटीमुळे सहा तालुक्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

- Advertisement -

यात जळगाव आणि चाळीसगाव तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला असल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागाने जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिरावून नेला आहे. दि. 20 मार्च रोजी जिल्हाभरात वादळी वार्‍यासह गारपीट झाली.

या गारपीटीमुळे ज्वारी, मका, गहु ही पिके अक्षरश: भूईसपाट झाली. तसेच बाजरी, हरभरा, कांदा, तीळ, मुग, फळपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

गारपीटीमुळे जळगाव आणि चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यात जळगाव तालुक्यात 1906 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले असून 48 गावातील 1710 शेतकरी बाधित झाले आहे.

तर चाळीसगाव तालुक्यात 1592 हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून 21 गावातील 2892 शेतकरी बाधित झाले आहे. तर इतर तालुक्यांमध्ये पाचोरा तालुक्यात 862 हेक्टर (बाधित शेतकरी 1176), बोदवड 89.40 हेक्टर (734), मुक्ताईनगर 46 हेक्टर (107), आणि भडगाव तालुक्यात 37.80 हेक्टर (70) पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकार्‍यांना आज सादर केला आहे.

शेतकरी संकटात

आधीच कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकर्‍यांच्या मालाला भाव नाही. अशा परिस्थीतीत निसर्गानेही शेतकर्‍यांच्या पोटावर मारले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरश: संकटात सापडला आहे. जिल्हा कृषी विभागाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी शासनाकडून या नुकसानीपोटी त्वरीत मदत मिळावी अशी मागणी शेतकर्‍यांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या