Friday, May 3, 2024
Homeनाशिककिसान एक्सप्रेसला देवळालीत हवे अधिकचे डबे : चावला

किसान एक्सप्रेसला देवळालीत हवे अधिकचे डबे : चावला

दे.कॅम्प। वार्ताहर

नाशिक,सिन्नर,व इगतपूरी, या तालुक्यातील शेतकर्‍यांचा द्राक्ष पिकांसह इतर शेतीमाल किसान एक्सप्रेसच्या माध्यमातून उत्तर भारतातील राज्यांमध्ये जाऊ लागल्याने शेतकरी व ग्राहक वर्गाला चांगला फायदा होत असतांना सध्या देवळाली रेल्वे स्टेशनवरुन अवध्या एक डब्याची व्यवस्था करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर शेतमाल पडून राहतो याची दखल घेऊन रेल्वेने जास्तीत जास्त डबे उपलब्ध करुन देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रतन चावला यांनी केली आहे.

- Advertisement -

गत वर्षी खा. हेमंत गोडसेंच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांनी शेतकर्‍यांची मागणी मान्य करत देवळाली ते गोरखपूर पर्यंत स्पेशल देशातील पहिली किसान रेल्वे सुरु केली. या गाडीला 24 डबे जोडण्यात आल्यानंतर त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त डबे देवळाली स्टेशनवरुन भरले जात होते.

या गाडीच्या भाड्यामध्ये सवलत दिली असल्याने व आठवड्यात तीन दिवस ही सेवा नियमितपणे सुरु असल्याने त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग घेत आहे. परंतु सध्या या गाडीचे विभाजन होऊन 24 पैकी 15 डबे सोलापूर डिव्हिजन मध्ये भरले जातात व 9 डबे भुसावळ डिव्हिजन मध्ये भरले जातात त्यातही या डिव्हिजन मध्ये देवळाली, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, खंडवा यांचा समावेश आहे. सोलापुरच्या एकट्या सांगोला क्षेत्राला 15 डबे देण्यात आले आहेत.

कोणाला किती डबे दिले याबाबत आमची कुठलीही तक्रार नसून भुसावळ डिव्हिजन मधील 5 स्टेशनला अवघे 9 डबे असल्याने या परिसरातील शेतीमाल मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहत आहे. यासाठी सदरची किसान एक्सप्रेस ही दररोज सुरु करुन भुसावळ व सोलापूर विभागाला समान डबे देण्यात यावे जेणेकरुन येथील शेतकर्‍यांचा शेतमाल पडून राहणार नाही व त्यांचे आर्थिक नुकसानही होणार नाही. अशी मागणी रतन चावला यांचे सह शांताराम ढोकणे, सुदाम वाजे, परशराम हारक, पंढरीनाथ हगवणे, बाळासाहेब आडके, सुरेश गवळी आदींनी केली आहे तसेच याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे आदींना पाठविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या