Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यातातडीने कोविड सेंटर उभारा

तातडीने कोविड सेंटर उभारा

नाशिक । प्रतिनिधी

शहरात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने दरररोजच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेत उपचारासंदर्भात काही प्रश्न उपस्थित झाले असल्याने शहरात सहा विभागांत जास्तीत जास्त भागांमध्ये कोविड केअर सेंटर उभारून नागरिकांना उच्च दर्जाची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी सर्वपक्षीय मागणी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली. यावर स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

- Advertisement -

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटच्या वर्षातील पहिली सभा आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभापती गिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत सदस्य सुधाकर बडगुजर, सलीम शेख, मुकेश शहाणे, समीना मेमन, प्रतिभा पवार, राहुल दिवे, योगेश हिरे, माधुरी बोलकर आदी सहभागी झाले होते. नाशिक महापालिकेच्या करोनासंदर्भातील उपलब्ध आरोग्य सुविधा चांगल्या नसल्याच्या तक्रारी समोर यात असून रुग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड होत आहे

याकडे प्रारंभी सुधाकर बडगुजर यांनी सभापतींचे लक्ष वेधले. यात महापालिकेच्या वतीने उभारल्या जाणार्‍या कोविड सेंटरची व्यवस्था बरोबर नाही. शहरातील करोना संक्रमणाचा वेग लक्षात घेता शहराच्या दृष्टीने येणारा काळ अतिशय भयावह आहे. येणार्‍या दोन महिन्यांत यापेक्षा भयावह चित्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेकडून शहरातील जास्तीत जास्त भागात कोविड केअर सेंटर सुरू करण्याची गरज आहे.

करोना रुग्णांची हेळसांड रोखण्यासाठी आता नवीन नाशिकमधील रुग्णांसाठी छत्रपती संभाजी स्टेडियमच्या जागेत कोविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणीही बडगुजर यांनी केली. तसेच प्रत्येक वॉर्डात ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याची गरज असून जास्तीत जास्त लसीकरण झाल्याचे चांगले परिणाम दिसणार आहेत. लसीकरणाच्या केंद्रावर अनेक ठिकाणी सेवकवर्ग अपुरा पडत आहे.

सध्या महापालिकेच्या एकही रुग्णालयात एम. डी. (फिजिशियन) डॉक्टर्स नाहीत. येणार्‍या काळात अशा डॉक्टरांची गरज मनपाला भासणार असल्याने वैद्यकीय विभागाने तातडीने या प्रश्नात लक्ष घालावे, असेही त्यांनी लक्षात आणून दिले. आकाशवाणी भाजीमार्केट येथे फक्त 165 बायोमेट्रिक भाजीविक्रेत्यांना बसण्यास परवानगी असताना पाचशे भाजीविक्रेते दररोज अतिक्रमण करत बसतात.

याकडे अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याकडे योगेश हिरे यांनी सभापतींचे लक्ष वेधले. यानंतर सभापतींनी प्रशासनाला तातडीने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. तसेच डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात रुग्णांना अपुर्‍या सुविधा उपलब्ध होत असून ऑक्सिजन बेडस्देखील रुग्णांना उपलब्ध होत नसल्याची तक्रार समीना मेमन यांनी केली. अशाप्रकारे सदस्यांनी करोनासंदर्भात उपाययोजना व तातडीने आरोग्यसेवा उभारण्याची मागणी केल्यानंतर सभापतींनी प्रशासनाला यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या