Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये 50 टक्के रुग्ण होम क्वाॅरंटाईन तरीही बेड्सची समस्या कायम 

औरंगाबादमध्ये 50 टक्के रुग्ण होम क्वाॅरंटाईन तरीही बेड्सची समस्या कायम 

औरंगाबाद – Aurangabad

महिराभरापासून औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. रोजचे हजारपेक्षा अधिक कोरोना रूग्ण निघत असून उपलब्ध बेड्स, आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे शासन निर्देशानुसार सौम्य लक्षणे असलेल्या बहुतांश रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये घरीच उपचार दिले जात आहे. आजघडीला शहरात एकूण 9,937 सक्रीय रूग्ण असून त्यापैकी सुमारे 50 टक्के 4,481 रूग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. तरीही शहरात बेड्सची समस्या कायम असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

मार्च महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्ग अधिक गतीने पसरू लागला आहे. विशेषतः औरंगाबाद शहरात तर कोरोना संसर्गाची साखळी दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत आहे. प्रत्येक वसाहतींतून कोरोनाचे नित्याने रूग्ण आढळत आहेत. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी मे महिन्यापर्यंत कोरोना संसर्गाचे रूग्णवाढीचे प्रमाण कायम राहणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता अधिकच वाढली आहे. शहरात आजघडीला रूग्णांना बेड्स मिळत नसल्याने शहरभर भटकंती करावी लागत आहे. अ‍ॅन्टिजेन तपासणीतून अहवाल लगेच प्राप्त होत असल्याने तपासणी केंद्रांवरून महापालिकेकडून रूग्णांना लगेच कोविड केअर सेंटरमध्ये हलवले जात आहे. मात्र आरटीपीसीआर चाचणीतून पॉझिटिव्ह येणार्‍या रूग्णांना बेड्सच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बेड्सची समस्या कमी करण्यासाठी शासन निर्देशानुसार सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना होम आयसोलेशन करण्यासाठी त्यांच्या घरात सुविधा उपलब्ध असल्यास घरीच उपचार घेण्याचे सांगितले जात आहे. प्राप्त अहवालानुसार शहरात 9,937 सक्रीय रूग्ण असून त्यापैकी 4,481 रूग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत.

आर्थिक लूट सुरूच

खासगी डॉक्टरांकडून होम आयसोलेट असलेल्या रूग्णांना उपचाराची सेवा दिली जात आहे. मात्र बदल्यात 10 ते 20 हजार रूपयांचे शुल्क वसूल केले जात आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी खासगी रूग्णालये व डॉक्टरांना होम आयसोलेशन असलेल्या रूग्णांकडून दहा दिवसांचे दोन ते तीन हजार रूपयेच शुल्क घ्यावे, असे बजावण्यात आले. नसता कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. मात्र याचे पालन होते आहे की नाही, याची चौकशी करण्यासाठी जिल्हा व पालिका प्रशासनाकडून तशी कोणतीही यंत्रणा उभी करण्यात आलेली नाही. त्यामुळे रूग्णांची आर्थिक लूट सुरूच आहे.

बेड्ससाठी शोधाशोध

आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालास उशीर लागत असल्याने अहवाल आल्यानंतर प्रत्येक कोरोना रूग्णास शोधून कोविड सेंटर किंवा शासकीय व खासगी रूग्णालयात हलवण्यासाठी जिल्हा व पालिका प्रशासनाने कोणतीही वाहतूक यंत्रणा सध्या उभी केलेली दिसून येत नाही. त्यामुळे कोरोना रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाच शहरात उपचारासाठी बेड्सची शोधाशोध करावी लागत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या