Sunday, May 19, 2024
Homeधुळेऔषधे आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध करा

औषधे आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध करा

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही गंभीर बाब आहे.

- Advertisement -

यासाठी पायाभूत सोयीसुविधांचा विस्तार करीत औषधे आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. उपलब्ध मनुष्यबळाचा परिपूर्ण वापर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

श्री. यादव यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून चाचण्यांची संख्या वाढवावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत नवीन यंत्रसामग्री कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे धुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने चाचण्या कराव्यात.

फेरीवाल्यांच्या नियमितपणे चाचण्या करून घ्याव्यात. वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्य यंत्रणेने उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर वापराचे नियोजन करावे. तसेच औषधे, यंत्रसामग्री, ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध होईल, असे नियोजन आरोग्य यंत्रणांनी करावे. रेमडेसिव्हर या इंजेक्शनचा कोविड बाधित गरजू रुग्णांनाच लाभ व्हावा म्हणून या औषधाचा अनावश्यक आणि गैरवापर टाळला पाहिजे.

त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांनी पुढे यावे. रेमडेसिव्हर औषधाचे सुरळीत वितरणासाठी आवश्यकता भासल्यास पोलिस दलाची मदत घ्यावी. अशी सुचना श्री. यादव यांनी केली.

कोरोना विषाणूच्या चाचण्या, कोविड रुग्णालयातील दरफलक, जम्बो कोविड ओपीडी, रेमडेसिव्हर इंजेक्शनचे वितरण, बेड मॅनेजमेंट, लसीकरण, ऑक्सिजन, मनुष्यबळाचे नियोजन आदींसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. हे अधिकारी संबंधित यंत्रणांकडून माहिती घेवून एकत्रित अहवाल सादर करतील, असेही श्री. यादव यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या