Friday, May 3, 2024
Homeनगरस्वच्छता कामगारांचे पगार देता येत नसेल तर राजीनामा द्या

स्वच्छता कामगारांचे पगार देता येत नसेल तर राजीनामा द्या

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

नगरपंचायतने स्वछता कर्मचार्‍यांचे 4 महिन्याचे पगार थकवल्यामुळे शिर्डी महाविकास आघाडीच्यावतीने सत्ताधारी भाजपाचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर आणि मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना जाब विचारत थकीत कामगारांचे पगार देता येत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आली.

- Advertisement -

शिवसेना नेते कमलाकर कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश गोंदकर, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे, विजय जगताप, सचिन कोते, उमेश शेजवळ, सुनील गोंदकर, दत्तूबाबा त्रिभुवन, अमृत गायके, सुरेश आरणे आदी उपस्थित होते.

सत्ताधारी गटाकडून भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, नगरसेवक सुजित गोंदकर, पप्पू गायके उपस्थित होते. दरम्यान सत्ताधारी गटात व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

कमलाकर कोते म्हणाले, स्वच्छता कर्मचार्‍यांचे 4 महिन्यांचे पगार करण्यात यावे आणि त्यांना एक महिन्याचा किराणा नगरपंचायततर्फे देण्यात यावा. अंत्यविधीच्या ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा कोविड विमा करावा आणि त्यांचा पगार दुप्पट करण्यात यावा. या मागणीवर नगराध्यक्ष म्हणाले, एक महिन्याचा पगार देऊ आणि उर्वरित दोन महिन्याचा पगार बीव्हीजी कंपनीकडून घेऊन देऊ.

राजेंद्र गोंदकर म्हणाले की, सरकार महाविकास आघाडीचे आहे. त्यांच्याकडून निधी खर्च करण्यास मान्यता आणा मग आम्ही कर्मचार्‍यांचे पगार करू. यावर उत्तर देताना कमलाकर कोते म्हणाले, सत्ताधार्‍यांनी राजीनामा देऊन प्रशासक नेमावा मग आम्ही प्रश्न कसे सुटत नाही ते बघू. जर तुम्ही राजीनामे दिले तर आम्ही एका दिवसात कामगारांचे पगार करू, असे आव्हानच त्यांनी दिले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले म्हणाले, स्वच्छता कर्मचार्‍यांच्या जिवावर नगरपालिकेने करोडो रुपयांचे बक्षीस मिळण्याबरोबरच शिर्डी नगरपंचायतीचे नांंव स्वच्छतेच्या माध्यमातून देशभर पोहोचविले आहे. करोनाच्या या कठीण प्रसंगात देखील स्वच्छता कर्मचारी हे एखाद्या योध्याप्रमाणे काम करत आहे. मग शहर स्वच्छतेचं काम करणार्‍या गोरगरिबांचे पगार का देत नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या