Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे । प्रतिनिधी

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याची तीव्रता आणखी वाढत असून, आज (दि.15) दुपारपर्यंत केरळ किनारपट्टीलगतच्या समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. ही वादळी प्रणाली महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीकडे येण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

- Advertisement -

लक्षद्वीप बेटांजवळ असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्राचे केंद्र ताशी 19 किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकत होते. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत त्याचे कमी तीव्रतेच्या वादळात (डीपडिप्रेशन) रूपांतरण होणार असून, उद्या दुपारपर्यंत केरळ किनार्‍यालगत चक्रीवादळ घोंगावणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनार्‍याकडे येताना या वादळाची तीव्रता अधिक वाढणार आहे. रविवारपर्यंत (दि.16) हे वादळ महाराष्ट्राच्या किनार्‍यालगतच्या समुद्रात पोहचेल. तर मंगळवारपर्यंत (दि.18) हे वादळ गुजरातच्या किनार्‍यापर्यंत पोचण्याचे संकेत आहेत.

या वादळी प्रणालीच्या प्रभावाने उद्यापासून (दि.15) केरळ, तामिळनाडूमध्ये जोरदार वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कर्नाटक, गोवा आणि कोकणात रविवारी (दि. 16) अणि गुजरा सोमवारी (दि. 18) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मंबईसह कोकणात जोरदार पाऊस, तर घाटमाथा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

वादळ महाराष्ट्राच्या किनार्‍याजवळून जाताना (दि.16 व 17) मुंबईसह, कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार वारे वाहणार आहेत. मुंबई आणि कोकणात वार्‍यांचा वेग ताशी 90 किलोमीटर तर मध्य महाराष्ट्रात ताशी 60 किलोमीटरपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. वादळामुळे उंच लाटा उसळून समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या