Friday, May 3, 2024
Homeशब्दगंधशब्दगंध - झाले गेले विसरून पुढे पुढे चालावे...

शब्दगंध – झाले गेले विसरून पुढे पुढे चालावे…

नाशिक | रवींद्र मालुंजकर

झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे

- Advertisement -

जीवन गाणे गातच रहावे.

सात सुरांचा हा मेळा व्यापून उरला विश्वाला

हृदयी हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला

तुमच्या माझ्या श्वासामधूनी आकारा यावे

जीवन गाणे गातच रहावे..

मातीमधूनी अंकुरली चैतन्याची दीपकळी

आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली

या मातीला या प्रितीला हितगुज सांगावे

जीवन गाणे गातच रहावे…

चिमणाबाई हिरमुसली गाल फुगवूनी का बसली

सान बाहुली ही इवली लटकी लटकी का रुसली

रुसली फुगली खुदकन हसली पापे किती घ्यावे.

जीवन गाणे गातच रहावे…

मानवी जीवन हा सुखदुःखाच्या उभ्या-आडव्या धाग्यांनी विणलेला शेला आहे, असे म्हणतात. जीवनात सुख आणि दुःख एकामागून एक येतच असतात. करोनाचा काळ हा असाच आपली परीक्षा पाहणारा आहे. त्यात आपल्या जवळच्या अनेक सुहृदांनी जरी जगाचा निरोप घेतला असला तरीही जगण्याच्या आशेने सुखाची शिदोरी प्रत्येकजण आपल्या बरोबर ठेवू पाहत आहे. ‘हेही दिवस निघून जातील…’

या न्यायाने आपण आपली सर्वतोपरी काळजी घेत आहोत. आपल्या जीवनाचं हे आनंददायी मधुर असे गाणे आपण जर सुरक्षित गायले, सकारात्मकपणे विचार ठेवला तर आपलेही जीवन सुमधूर होईल.

प्रत्येकाच्या जीवनात संकटे येतच राहतात. त्या संकटांवर मात करून यशसौख्याची पताका जो उत्साहाने फडकवतो; तोच माणूस यशस्वी होतो. दुःख-वेदना कवटाळून बसण्यापेक्षा आपले मन आनंदप्राप्तीच्या गोष्टींमध्ये रमवावे.

आनंददायी गाणी ऐकावी, गावी. वाचन करावे. आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेत, दुसर्‍याच्या सुखात सहभागी होणारा माणूस जीवनाचे गाणे निश्चितच आनंदाने गात असतो. दुसर्‍याच्या दुःखावर फुंकर घालून त्याच्या चेहर्‍यावर हसू फुलवणारी व्यक्ती ही सदैव भरभरून जीवनानंद देत-घेत असते.

कितीही संकटे आली तरी थांबू नका. कितीही त्रास झाला तरी डगमगू नका आणि सतत नावीन्याचा ध्यास घेऊन आनंदाने गात रहा फक्त एकच गाणे-जीवनगाणे

- Advertisment -

ताज्या बातम्या