नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात (Mahasrul Area) अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने फिर्यादी कुटुंबास गरजेपोटी दिलेल्या पाच लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल १८ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. याबाबत उन्नती योगेश जैन (वय ३४) या पीडित विवाहितेने म्हसरुळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार मंगला दीपक आहिरे उर्फ गायकवाड, दीपक गायकवाड, भोजुसिंग गिरासे व काका नावाच्या संशयित सावकारांविरोधात (Moneyleaders ) मंगळवारी(दि. १४) गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलविले जाणार आहे.
हे देखील वाचा : नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विलीन होणार – पंतप्रधान मोदींची घणाघाती टीका
शहरात अवैध सावकारी फोफावतच चालली असून अनेकांकडे परवाने नसतांनाही त्यांनी लाख रुपयांच्या कर्जापोटी कर्जदारांकडून सात ते आठ लाख रुपये उकळले आहेत. त्यामुळे सावकारीचा धंदा तेजीत असून पूर्वी साध्या दुचाकीवर फिरणारे सावकार गळ्यात सोन्याच्या चैन घालून अलिशान कारमधून फिरतांना पाहायला मिळत आहेत. मागील महिन्यांत अवैध सावकार वैभव देवरे याचा छळ समोर आल्यावर त्याच्यावर पाच गुन्हे दाखल झाले. त्यात तो सध्या चौथ्या गुन्ह्यात अटक असून त्याने कोट्यवधी रुपयांची प्राॅपर्टी जमविली आहे. त्याच्याकडे तपास सुरु असतानाच म्हसरुळ पोलिसांत नव्याने सावकारीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हे देखील वाचा : महायुती लोकसभेच्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी थेट आकडाच सांगितला
पीडित तक्रारदार उन्नती जैन(रा. साई संस्कृती अपार्टमेंट, शिवगंगानगर, म्हसरुळ) या घरगुती शिवणकाम करतात. मार्च २०२२ मध्ये त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य आजारी पडला. त्याच्यावर उपचार करण्यासाठी उन्नती व त्यांचा पती योगेश यांना आर्थिक चणचण भासली. त्यासाठी त्यांनी संशयित सावकार मंगला व दीपक आहिरे-गायकवाड यांच्याकडून पाच लाख नऊ हजार रुपये व्याजाने घेतले. यानंतर जैन यांनी ठरल्याप्रमाणे दरमहा २० टक्के दराने पैसे देण्याचे सांगत आहिरे-गायकवाड यांनी मार्च २०२४ पर्यंत पाच लाख रुपयांच्या मोबदल्यात व्याज, मुद्दल, दंड मिळून तब्बल २३ लाख ५४ हजार रुपये वसूल केले. याबाबत गुन्हा दाखल करुन सर्व अंगांनी तपास सुरु केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिली.
हे देखील वाचा : शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार – मंत्री भुजबळ
तरीही सात लाखांची मागणी
जैन यांच्याकडून २० टक्क्यानुसार साडे तेवीस लाख रुपयांची अवैध वसुली केली असताना देखिल वरील चौघा सावकारांनी जैन यांच्याकडे अतिरिक्त सात लाख रुपयांच्या वसुलीसाठी तगादा लावला. हे पैसे न दिल्यास घराचे कागदपत्रे ताब्यात देण्याची मागणी केली. तसेच घरी येवून जैन दाम्पत्यास शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.