Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखअन्नाची नासाडी थांबवण्याचा जाणीवपूर्वक एक प्रयत्न!

अन्नाची नासाडी थांबवण्याचा जाणीवपूर्वक एक प्रयत्न!

जगात काही देशांची समृद्धी वाढत आहे. त्यासमृद्धीसोबतच काही नव्या नव्या समस्या देखील त्या राष्ट्रांना भेडसावू लागल्या आहेत. अन्नाची नासाडी ही त्यापैकीच एक समस्या दिवसेदिवस उग्र स्वरुप धारण करत आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी 90 कोटी टन इतके प्रचंड अन्न वाया जाते असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात नमूद आहे. भारतीय संस्कृतीत अन्नदानाला महादान म्हटले आहे. अन्नदानाची महती संतांनी देखील सांगितली आहे. भुकेल्या जीवाच्या ओठी दोन घास अन्न देणार्‍याला संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगात साधू-संतांची उपमा दिली आहे. अन्न वाया घालवू नये असा संस्कार घरातील लहानांवर जाणीवपूर्वक केला जातो. पण भारतातही वाढत्या संपन्नतेसोबतच अन्ननासाडीची समस्या सुद्धा वाढत आहे. प्रत्येक व्यक्ती दरवर्षी साधारणत: 50 किलो अन्न वाया घालवते असा निष्कर्षही त्या अहवालात नमूद आहे. अन्न वाया घालवू नये हे मूल्य विद्यार्थी दशेतच रुजवण्यासाठी केंद्र सरकारने अन्नाचे महत्व सांगणार्‍या धड्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व राज्यांना तसे आदेशही दिले आहेत. जेवणातून माणसे किती अन्न वाया घालवतात? ते न घालवल्याचा काय फायदा होईल? जेवणात अन्न टाकून देण्याची सवय कशी रोखावी? अशा अनेक मुद्यांचा धड्यात समावेश असेल असे यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. एकीकडे प्रचंड प्रमाणात अन्न वाया जातो तर दुसरीकडे कोट्यवधी लोक उपाशी झोपतात हा विरोधाभास सगळीकडेच आढळतो. भारतात दररोज 30-40 कोटी लोकांना अन्न मिळाले नाही म्हणून अर्धपोटी किंवा उपाशी झोपावे लागते असे सांगितले जाते. दरवर्षी काही लाख लोकांचा उपासमारीने मृत्यू होतो. सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ आणि लग्नानिमित्त घातल्या जाणार्‍या जेवणावळींमध्ये पदार्थांची रेलचेल असते. जेवणावळी म्हटले की लोकांना शाही पंगत आठवते. विवाहसोहळ्यांपेक्षा त्यातील जेवणावळीचीच जास्त चर्चा रंगते. किंबहुना जेवणावळी हे प्रतिष्ठेचे परिमाण बनले आहे. अमक्याच्या लग्नातील जेवण फक्कड होते..तमक्याच्या लग्नाला गेलो पण पोट भरले नाही’ अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करतात. ‘नवरा येतो नवरीसाठी आणि वर्‍हाड येते जेवणासाठी’ अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. पण अशा पंगतींमध्ये खाणारांच्या पोटात गेलेले अन्न किती आणि वाया गेलेले अन्न किती याची आठवण कोणाला तरी राहाते का? अशाच कार्यक्रमांमध्ये फेकून दिलेल्या अन्नाचे प्रमाणही पदार्थांच्या रेलचेलीइतकेच किंबहुना त्यापेक्षाही जास्तच असते. घरे छोटी होत गेली म्हणून कार्याकरता मोठ्या जागा घेतल्या जातात. तरीही वाढत्या गर्दीला जागा अपुरी पडेल या खात्रीने जेवणाची पाट-ताटाची पंगत बंद झाली. बुफे पद्धती सध्या प्रचलित आहेत. हाताने आपल्याला हवे तेवढे अन्न घेता येते म्हणून नासाडी थांबेल हा समज भारतीयांनी खोटा ठरवला आहे. हाताने भरभरून वाढून घेऊन तिथेच त्यातील बराचसे अन्न टाकून देण्याचे प्रकारही बुफे पद्धतीत वाढले आहेत. लोकांनी जेवढे लागेल तेवढेच पदार्थ ताटात वाढून घ्यावेत. जास्तीचे पदार्थ वाढून घेऊन अन्न वाया घालवू नयेत असे प्रयत्न किती लोक जाणीवपूर्वक करतात? अन्नाची नासाडी आणि त्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करणार आहे. विद्यार्थ्यांच्या सवयी बदलवण्याचा धडा शिकवणार आहे. ही समयोचित आवश्यक कल्पना आहे. म्हणून स्वागतार्ह आहे. याविषयी समाजातही जागरुकता वाढवण्याची गरज आहे. लोकसंख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादनही कधी ना कधी कमीच पडणार आहे. त्यामुळे अन्नाचे महत्व लोकांच्या मनावर ठसवण्याचे काम करावेच लागणार आहे. नाशिकला पार पडलेल्या साहित्य संमेलनाने यासंदर्भात एक धडा घालून देण्याचा प्रयत्न केला. साहित्य संमेलनात जेवणावळी सतत सुरु होत्या. जे लोक ताटात अन्न तसेच टाकून देत होते त्यांना एकतर ते खायला लावले जात होते. आणि ज्यांची तशी तयारी नव्हती त्यांना दोनशे रुपये दंड ठोठावला जात होता. पण असे विधायक प्रयत्न विरळाच! आता ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असल्याची जाणीव विद्यार्थी दशेतच करुन दिली जाणार आहे. या निर्णयाचे लोक स्वागतच करतील अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या